गुटखा तस्कर बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात
भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या डीबी पथकाची कामगिरी : 72 हजारांच्या गुटख्यासह दुचाकी पोलिसांनी केली जप्त
भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी गुटखा विक्री करणार्याच्या मुसक्या आवळल्यानंतर पोलिस तपासात त्याने हा गुटखा जळगावातील गुटखा व्यापार्याकडून खरेदी केल्याची कबुली दिल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी तीन गुटखा तस्करांच्या जळगावातून मुसक्या आवळत त्यांच्याकडून 72 हजारांचा गुटखा व दुचाकी जप्त केली आहे. या कारवाईने गुटखा विक्री करणार्यांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील जामनेर रोडवरील सिंधी कॉलनी गुटखा विक्रीचे मुख्य केंद्र असून मध्यप्रदेशातील बर्हाणपूरातून येथे मोठ्या प्रमाणावर गुटख्याची आवक होत असल्याने त्या दृष्टीने पोलिसांनी कारवाई करण्याची अपेक्षा आहे शिवाय जंक्शन शहरात पानटपर्यांमध्ये बिनदिक्कतपणे गुटख्याची विक्री रोखण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.
आरोपीच्या कबुलीनंतर तिघांना अटक
शहरातील आवेश पार्क, डायमंड कॉलनीतील रहिवासी यासीन उर्फ आज्जु अन्वर शेख यास 23 रोजी बाजारपेठ पोलिसांनी गुटख्याच्या साठ्यासह अटक केली होती. आरोपीला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावल्यानंतर त्याची बारकाईने चौकशी केल्यानंतर त्याने हा गुटखा जळगाव शहरातील सिंधी कॉलनी भागातील जे.बी.ट्रेडर्समधून खरेदी केल्याची कबुली दिली. बाजारपेठ पोलिसांच्या डीबी पथकाने त्यांनी मुख्य व्यापारी आरोपी गिरीष राजेलदास खानचंदानी (40, रा.आदर्श नगर, जळगाव), जयेंद्र मनोहरलाल स्वामी (26, रा.आदर्श नगर जळगाव) व शेख शकील शेख मासूम (41, रा.खंडेराव नगर, जळगाव) यांना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून 72 हजार 187 रुपये किंमतीचा विमल, सागर गुटका, राज निवास गुटखा तसेच सात हजार रुपये किंमतीची लुना मिळून 79 हजार 187 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक कृष्णा भोये, गणेश धुमाळ, अनिल मोरे, मंगेश गोंटला, विकास सातदिवे, रवींद्र तायडे, प्रशांत परदेशी, चेतन ढाकणे, ईश्वर भालेराव, सुभाष साबळे, प्रशांत सोनार, चालक अय्याज सैय्यद आदींनी केली. कारवाईकामी जळगाव एमआयडीसीचे एएसआय आनंदसिंग पाटील, योगेश साबळे, तायडे आदींनी सहकार्य केले.

