फसवणूक झाल्यास ग्राहक कायद्याने मिळेल न्याय
भुसावळसह यावल शहरात ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रम : मान्यवरांनी ग्राहक कायद्याची दिली माहिती
भुसावळ : विविध वस्तूंच्या खरेदीनंतर ग्राहकाची फसवणूक झाल्यास ग्राहक कायद्याद्वारे निश्चित न्याय मिळतो, अशी माहिती भुसावळ व यावल येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांनी दिली. राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या भुसावळ तालुका पदाधिकार्यांच्या वतीने भुसावळातील विठ्ठल मंदिर वार्डात ग्राहक दिन साजरा करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी जिल्हा सचिव अॅड.जास्वंदी भंडारी, प्रमुख वक्ते प्र.ह.दलाल, प्रमुख पाहुणे नाना पाटील, फाऊंडेशनचे राज्य समन्वय राजेश सैनी यांची उपस्थिती होती. प्रस्तावना फाउंडेशन तालुका अध्यक्षा उज्वला बागुल यांनी केली. प्रमुख वक्ते प्र.ह.दलाल यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ग्राहकांनी वस्तू घेतांना कोणती खबरदारी घ्यावी व ग्राहकांची भेसळीद्वारे कशी फसवणूक होते याबाबत माहिती दिली. ग्राहकांनी ग्राहक कायदा समजून घेऊन त्या अनुषंगाने फसवणूक झाल्यास न्याय मागावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रमुख पाहुणे नाना पाटील यांनीही जाहिरातीद्वारे ग्राहकांची कशी फसवणूक होते हे सांगितले.

मूल्य देवून सेवा घेणारा ग्राहक
अॅड.जास्वंदी भंडारी (पाटील) म्हणाल्या की, ग्राहक म्हणजे जो मूल्य देऊन सेवा घेतो किंवा वस्तू अशी व्यक्ती आणि अशाच व्यक्तीने वस्तू घेताना कोणती काळजी घ्यावी व कुठे व कशा पद्धतीने न्याय मागावा व कोणत्या स्तरावर मागता येईल याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ.नितीन यावलकर यांनी तर आभार प्रदर्शन अॅड.निलेश भंडारी यांनी मानले. यशस्वीतेसाठी हर्षल गोरवाडकर, प्रदीप बावस्क, अॅड.विक्रम शेळके, विवेक सैनी, किशोर बर्हाटे, प्रेम परदेशी, मंदार बागुल, अजय रायकवार,कमलाकर महाजन यांनी परीश्रम घेतले. नेहा यावलकर, वंदना चौगुले, रेखा धुपे यांची उपस्थिती होती.
यावल तहसीलमध्ये वेबिनारद्वारे मार्गदर्शन
यावल : तहसीलदार कार्यालयात 24 रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी ऑनलाईन वेबिनारद्वारे मार्गदर्शन केले. राष्ट्रीय ग्राहक दिनाबाबत मार्गदर्शन करून तालुका स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांना जनजागृती करण्याबाबत सूचित केले. तहसीलदार महेश पवार, गटविकास अधिकारी निलेश पाटील निवासी, नायब तहसीलदार के.पवार, आर.डी.पाटील, अंकिता वाघमडे, पुरवठा निरीक्षक तडवी, शिवानंद कानडी, एस.टी.जगताप सहभागी झाले. प्रत्येक ग्राहकाने वस्तूची खरेदी करताना पावती घ्यावी, ग्राहकांनी कोणत्याही प्रकारची खरेदी करताना वजन तपासून घ्यावे तसेच ऑनलाइन पद्धतीने व्यवहार करताना काळजीपूर्वक व्यवहार करावे करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

