भुसावळात लिलावापूर्वीच रेल्वेचे लाखोंचे साहित्य चोरीला


भुसावळात लिलावधारकांचा गदारोळाने लिलाव प्रक्रियेला स्थगिती : जीर्ण घरांच्या खिडक्यांसह दारे गायब

भुसावळ : रेल्वे प्रशासनाने हद्दीवाली चाळ परीसरातील जीर्ण झालेल्या रेल्वे निवासस्थाने तोडून तेथील साहित्य विक्रीचा लिलाव रेल्वेच्या वरीष्ठ अभियांत्रिकी विभागात ठेवला मात्र प्रत्यक्ष रेल्वेच्या निवासस्थानांची पाहणीनंतर जीर्ण क्वाटर्सचे अर्ध्याहून अधिक दरवाजे, खिडक्या आणि इतर लाखो रुपयांचे साहित्य चोरीस गेल्याचा आरोप लिलावधारकांनी करीत यास विरोध केल्याने ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली. याबाबत रेल्वे अधिकारी अनभिज्ञ असल्याने अद्यापही चोरीबाबत कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. रेल्वेचे लाखो रुपयांचे साहित्य चोरी होत असताना रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

लाखोंचे साहित्य चोरीस
रेल्वेच्या हद्दीवाली चाळ परीसरातील 73 जुने निवासस्थाने तोडून त्यातून निघणारे साहित्य विक्रीसाठी पाच लाख 32 हजार 970 रुपये किमतीची लिलाव प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी दुपारी 3 वाजेच्या सुमारास यासाठी बोली लागणार होती मात्र बोली लागण्याच्या अगोदर लिलावधारकांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता हे क्वाटर्स तोडण्यात येऊन येथील सागवान लाकडाचे दरवाजे, खिडक्या, पत्रे, लोखंडी अँगल, पाणीपुरवठ्याची लोखंडी पाईपलाईन आदी साहित्य क्वार्टर्सच्या तुलनेत अत्यल्प दिसून आले. केवळ दोनच खोल्यांमध्ये साहित्य ठेवण्यात आले आहे. उर्वरीत साहित्य हे ट्रकद्वारे चोरीस नेऊन विक्री केल्याचा आरोप लिलावधारकांनी केला. यावेळी लिलावधारकांनी अधिकार्‍यांसमोर गदारोळ केल्याने तणाव निर्माण झाला असता, आरपीएफ कर्मचार्‍यांना बोलविण्यात आले होते. लिलावाच्या किमतीच्या तुलनेत हे साहित्य कमी असल्याने केवळ उर्वरीत साहित्य नमूद करून तितक्याच किमतीची लिलाव प्रक्रिया घेण्यात यावी, अशी मागणी लिलावधारकांनी केल्याने ही प्रक्रिया रद्द करण्यात आली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !