29 गुन्ह्यातील लाखोंचा मुद्देमाल फिर्यादीला परत
मुद्देमाल परतीनंतर तक्रारदाराच्या तोंडून निघणार्या शब्दांनी पोलिस सुखावतात : जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे : आठ वर्षांनी चोरीला गेलेले सौभाग्याचे लेणं मिळताच नशिराबादची महिला गहिवरली
भुसावळ : प्रत्येक गुन्ह्याचा छडा लागावा, अशी पोलिस दलाची प्रामाणिक भावना असतो शिवाय चोरी-घरफोडीचा गुन्हा उघडकीस आल्यानंतर त्यातील शंभर टक्के मुद्देमाल जप्त करण्याचा तपास अधिकार्यांचा प्रयत्न असतो मात्र अनेकवेळा त्यात अडचणी येवून केवळ 60 ते 70 टक्के मुद्देमाल रीकव्हरी करण्यात यश येते शिवाय ज्या गुन्ह्यात शंभर टक्के रीकव्हरी झाली त्या केसमध्ये तक्रारदाराला हा संपूर्ण मुद्देमाल परत केला जातो. तक्रारदाराला मुद्देमाल परत केल्यानंतर पोलिस दलाविषयी त्यांनी काढलेले दोन प्रेमाचे शब्द हे पोलिसांसाठी चिरकाल समाधान देणारे ठरतात, असे विचार जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी व्यक्त केले. जामनेर रोडवरील डीवायएसपी
कार्यालयाच्या आवारात शनिवारी सकाळी 29 गुन्ह्यातील तक्रारदारांना लाखो रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला. दरम्यान, आठ वर्षांपूर्वी चोरीला गेलेले मंगळसूत्र परत मिळताच नशिराबाद येथील महिला गहिवरल्याने वातावरण अधिक भावूक झाले. पोलिस दलाच्या कार्याचे महिलेने कौतुक करीत त्यांचे आभारही मानल्याने पोलिस कर्मचारीही सुखावले.
29 गुन्ह्यातील मुद्देमाल तक्रारदारांना परत
भुसावळ विभागात दाखल असलेल्या तब्बल 29 गुन्ह्यातील तक्रारदारांना सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल, टू व्हीलर, रीक्षा आदी लाखो रुपयांचा मुद्देमाल जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला. यावेळी अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी,
डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी तर आभार पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी मानले. यावेळी डीवायएसपी वाघचौरे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश उपस्थितांना सांगितला.

मुद्देमाल परतीची प्रक्रिया किचकट : चंद्रकांत गवळी
अपर पोलिस अधीक्षक गवळी म्हणाले की, एखाद्या गुन्ह्यात जर फिर्यादीचा मुद्देमाल सापडला असेल तर तो परत मिळेल का याची माहिती
सुध्दा त्यांना नसते. गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल परत मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर किचकट प्रक्रीया राहते, याची माहिती फिर्यादींना नसते,
त्यामुळे अनेक जण मुद्देमालही परत नेत नाही, असेही ते म्हणाले.
यांची होती उपस्थिती
यावेळी पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, नशिराबाद येथील सहा.पोलिस निरीक्षक गणेश चव्हाण यांच्यासह शहर पोलिस ठाणे, बाजारपेठ आणि तालुका पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड कार्यक्रमास उपस्थित होते.
सौभाग्याचे लेणं मिळताच महिला गहिवरली
नशिराबाद येथील तक्रारदार महिलेचे 2008 मध्ये मंगळसूत्र चोरट्यांनी धूम स्टाईल लांबवले होते. या प्रकरणी गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या गुन्ह्याचा यशस्वी तपास करीत शनिवारी तक्रारदार महिलेला आमंत्रीत करीत जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या हस्ते डोरले व सोन्याचे मणी परत केल्यानंतर महिलेला गहिवरून आले. प्रतिकुल परीस्थितीत उदरनिर्वाह करीत असताना झालेल्या चोरीमुळे महिला व्यथीत होती मात्र आठ वर्षानंतर चोरीला गेलेले सौभाग्याचे लेणं परत मिळताच या महिलेने पोलिस दलाचे आभार मानले शिवाय चोरी गेलेले मंगळसूत्र परत मिळेल हे स्वप्नातदेखील वाटले नसल्याचे महिलेने मनोगतात सांगितले.

