शाखा निवडतांना नोकरीच्या संधींचा विचार करावा


प्रा.धीरज पाटील : नवी धोरणे, नवी दिशा कार्यक्रमात रोजगाराच्या संधींवर मंथन

भुसावळ : केंद्र सरकार आणि राज्य सरकार कौशल्यनिर्मिती अभ्यासक्रमांवर भर देत आहेत. ‘मेक इन इंडिया’ अथवा ‘मेक इन महाराष्ट्र’ या संकल्पना यशस्वी करण्यासाठी विविध घटकांसोबत रोजगार तसेच स्वयंरोजगार क्षेत्रात कौशल्यप्राप्त मनुष्यबळाची व्याप्ती वाढवण्याच्या अनुषंगाने इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकॉम इंजिनियरींगच्या अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल केले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी आज शाखा निवड करतांना चार वर्षांनंतरच्या रोजगाराच्या संधीचा विचार केलाच पाहिजे, असे मत प्रा.धीरज पाटील यांनी टेलिकॉम इंजिनियर्स असोसिएशनतर्फे आयोजित ‘नवी धोरणे, नव्या दिशा’ या मार्गदर्शनपर कार्यक्रमात व्यक्त केले.

यांचा कार्यक्रमात सहभाग
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, डीन डॉ.राहुल बारजिभे, विभाग प्रमुख डॉ.गिरीष कुळकर्णी व प्राध्यापक उपस्थित होते. विद्यार्थी व पालकांनी ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमात सहभाग नोंदवला.


इलेक्ट्रॉनिक्स टेलिकॉम तंत्रज्ञानाचे तरुणांना आकर्षक
इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉम अभियांत्रिकीमुळे औद्योगिकीकरण, दळणवळण आदी क्षेत्रामध्ये प्रचंड सुलभता आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा मानवाच्या दैनंदिन व्यवहारात प्रचंड वापर वाढला आहे यामुळे इलेक्ट्रॉनिक्स टेलिकॉम तंत्रज्ञानाचे प्रचंड आकर्षण असल्याने अनेक तरुणांना या क्षेत्रात काम करावेसे वाटते. इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी शाखेच्या अभ्यासक्रमाचा आवाका प्रचंड आहे. यात मूलभूत इलेक्ट्रॉनिक्स विषयापासून ते दूरसंचार, औद्योगिकरण, सर्किट डिझाइन, कॉम्प्युटर नेटवर्किंग, मोबाइल व कृत्रिम उपग्रह दळणवळण, रडार, एम्बडेड सिस्टिम्स, इमेज प्रोसेसिंग, इंटरनेट ऑफ थिंग्स यांसारख्या आधुनिक विषयांचा अभ्यास होतो. विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून या क्षेत्रात उत्कृष्ट करिअर घडवू शकतो. विद्यार्थी व पालकांपर्यंत रोजगाराच्या भविष्यातील संधीची माहिती पोहचवणे आवश्यक असल्याचे प्रा.पाटील म्हणाले.

उज्ज्वल भविष्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स टेलिकॉम शाखेला प्राधान्य : प्रा.संतोष अग्रवाल
प्रा.संतोष अग्रवाल म्हणाले की, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन शाखेचे विद्यार्थी एक प्रकारे नशीबवान असतात कारण स्वतःच्या कोअर शाखेतील नोकर्‍यांबरोबरच त्यांना ऑटोमेशन, आय.टी., मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील कंपन्यातदेखील मोठ्या प्रमाणावर संधी असते. श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकॉम शाखेचे विद्यार्थी टीसीएस, आयबीएम, मायक्रोसॉफ्ट, काँगझीनेट, कॅपजेमिनी, इन्फोसिस या मल्टिनॅशनल कंपन्यात काम करीत आहेत. पालकांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करीत इलेक्ट्रॉनिक्स टेलिकॉम शाखेला प्राधान्य द्यावे, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्रात अनेक इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर बनणार
5 जी तंत्रज्ञानाचे पडघम जगभरात वाजता आहेत. प्रशासनातर्फे आयात केल्या जाणार्‍या तीन हजार इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे भारतातच उत्पादन करण्यासाठी बर्‍याचशा राज्यात इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टरची स्थापना करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर बनणार आहे. 2021 मध्ये भारतात 5 जीची क्रांती सुरू होणार असून संपूर्ण नेटवर्क स्वदेशी असेल याशिवाय हार्डवेअर आणि टेक्नॉलॉजीदेखील स्वतःची असणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !