भुसावळात दंड वसुलीतून शहर वाहतूक शाखा लखपती


डिसेंबर महिन्यात 4842 वाहनांवर कारवाई : दहा लाख 14 हजार 700 रुपयांचा दंड वसुल

भुसावळ : शहर वाहतूक शाखेने एकाच महिन्यात चार हजार 842 वाहनांवर कारवाई करीत तब्बल दहा लाख 14 हजार 700 रुपयांचा दंड वसुल केला. वाहतूक नियम मोडणार्‍या वाहनधारकांविरुद्ध पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरचे पोलिस निरीक्षक तथा शहर वाहतूक प्रभारी बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाल डिसेंबर महिन्यात धडक मोहिम राबवण्यात आल्याने वाहन धारकांमध्ये मोठी खळबळ उडाली. याच महिन्यात प्रलंबित केसेसमधून एक लाख 48 हजार दंड वसुल करण्यात आला आहे.

या वाहनधारकांवर झाली कारवाई
डिसेंबर महिन्यात 15 केसेस रीक्षा चालक, फॅन्सी नंबर प्लेटच्या तीन केसेस, 108 दुचाकी स्वारांचे नियमबाह्य नंबरप्लेट, वाहन चालविण्याचा परवाना जवळ न बाळगल्या प्रकरणी दोन हजार 337 केसेस, ट्रीपल सीट 124, विना गणवेश परीधान करून रीक्षा चालवल्याप्रकरणी 98 तर सीट बेल्ट न लावता ड्रायव्हींग केल्याप्रकरणी 182, पोलिस इशारा भंग केल्याप्रकरणी 611, वाहन चालवितांना मोबाईलवर बोलणे 60 व तीन हजार 765 इतर मोटार व्हेईकल अ‍ॅक्टप्रमाणे केसेस करण्यात आल्या आहे. शहर वाहतूक शाखेने जानेवारी 2020 ते डिसेंबर 2020 पर्यंत 24 हजार 409 वाहन चालकविरुध्द कारवाई केली. त्यातून 51 लाख 66 हजार 500 रुपये दंड आकारण्यात आलेला आहे. 17 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2020 दरम्यान 11 हजार 394 केसेस करण्यात आल्याव 24 लाख 22 हजार 900 दंड आकारण्यात आला.


नियम मोडल्यास धडक कारवाई
शहरात यापुढे अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहन चालकांसह बेशिस्त वाहन चालक, विना युनिफॉर्म रीक्षा चालवणारे चालक, विना लायसन्स तसेच ट्रीपल सीट, मोबाईल फोनवर बोलणे, राँग साईड वाहन चालविणे, हेल्मेट परीधान न करणे, विना नंबर प्लेट,/विचित्र नंबर प्लेट वाहन, अल्पवयीन मुले/मुली वाहन चालविणे आदी नियमांचे भंग करताना वाहन धारक आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !