दरोड्याच्या तयारीतील दोघे रावेर पोलिसांच्या जाळ्यात
रावेर : शहरातील नवीन शासकीय विश्रामगृहामागील अजंदा रस्त्यावर सहा संशयीत दरोड्याच्या उद्देशाने आल्याची माहिती रावेर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचला मात्र अंधाराचा फायदा घेवून चोघै संशयीत पसार झाले तर दोघांच्या मुसक्या आवळण्यात रावेर पोलिसांना यश आले. सोमवारी पहाटे दिड वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. शेख हसन शेख अन्वर (24, फतेहनगर, रावेर) व गोलू अब्दुल अकिल अब्दुल शकील (25, हुसैनी मस्जिद जवळ, रावेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून मिरची पूड, छोटा चाकू तसेच घटनास्थळावरून कुर्हाड, दोन कटावणी, एक सुती पांढरी दोरी आदी दरोड्यातील साहित्य जप्त करण्यात आले.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई रावेरचे निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक शीतलकुमार नाईक, मनोहर जाधव, महेंद्र सुरवाडे, सुनील वंजारी, प्रमोद पाटील, सुरेश मेढे, कुणाल सोनवणे, सुकेश तडवी, विशाल पाटील, मंदार पाटील आदींच्या पथकाने केली. दरम्यान, अटकेतील आरोपींनी पळालेल्या साथीदारांमध्ये आकाश लक्ष्मण रील, शे.बाबा शेख कलीम, शे.अक्रम मिठाई शे.मुस्ताक, तिबु ईस्माईलखान याकूब खान अशी नावे असल्याची कबुली दिली. या प्रकरणी कॉस्टेबल महेश मोगरे यांच्या फिर्यादीनुसार आरोपींविरुद्ध भादंवि 399 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. अटकेतील दोघा आरोपींना न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली.


