हरणखेड ते राजूर रस्त्याचे काम निकृष्ट असल्याचा आरोप
बोदवड : तालुक्यातील राजुर ते हरणखेड दरम्यानचा सहा किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे डांबरीकरण माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नाने मंजूर झाले होते तर चार कोटी 39 लाख 72 हजार रुपयांचा निधी त्यासाठी मंजूर झाला होता. याच रस्त्यावर दोन काँक्रीट मोरी व हरणखेड गावालगत 400 मीटर सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम मंजूर आहे. रस्त्याचे हरणखेड गावालगत काम सुरू करण्यात आले असलेतरी निकृष्ट दर्जाची मातीमिश्रीत रेती व हलक्या दर्जाचे सिमेंट वापरले जात असल्याचा आरोप आहे.
दोषींवर कारवाईची मागणी
निकृष्ट कामाबाबत हरणखेड येथील ग्रामपंचायत सदस्य रूपेश गांधी यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे उप अभियंता दाभाडे यांच्याकडे भ्रमणध्वनीवर तक्रार केली असता कार्यालयात येऊन लेखी तक्रार द्या, असे सांगत उडवा-उडवीचे उत्तर देण्यात आल्याचा आरोप आहे. दोन्ही मोर्यांचे अत्यंत निकृष्ट पद्धत्तीने बांधण्याचे काम सुरू असून निकृष्ट कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. रूपेश गांधी म्हणाले की, निकृष्ट कामामुळे हे काम बंद पाडण्यात आले असून या संदर्भात वरीष्ठ स्तरावर तसेच माजी मंत्री खडसे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले.


