अंतराळात झेपावणार सर्वात कमी वजनाचे शंभर उपग्रह


7 फेब्रुवारीला होणार रामेश्‍वरममध्ये जागतिक विक्रम : भुसावळ शहरातील 11 बाल वैज्ञानिकांची निवड

भुसावळ : डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन आणि स्पेस झोन इंडिया अंतर्गत शालेय विज्ञान शोध प्रकल्प अनुषगाने 100 उपग्रह तयार करण्यात आले असून 7 फेब्रुवारीला जागतिक विक्रम करण्यासाठी रामेश्वरम येथे जय्यत तयारी सुरू आहे. या अंतराळ मोहिमेसाठी देशभरातील एक हजार सहभागी विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील 356 तर भुसावळ शहरातील 11 प्रतिभावान विद्यार्थ्यांची बालवैज्ञानिक म्हणून निवड करण्यात आली आहे.

डॉ.कलामांच्या आठवणी जपण्यासाठी स्थापना
डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनची स्थापना कलाम साहेबांच्या आठवणी आणि विचार जपून ठेवण्यासाठी करण्यात आली आहे. शिक्षण कौशल्य व्यवस्थापन, ज्ञान विकसित करण्याची क्षमता, नोकरीची संधी शोधण, संशोधन मेंदू शक्ती विकसीत करणे, शाश्वत ऊर्जा संसाधने तयार करणे आणि वितरित करणे ह्या बरोबरच ह्या सर्व गोष्टी खेड्यातील आणि देशातील सर्व अविकसित क्षेत्रापर्यंत पोहोचवणे हे संस्थेचे ध्येय आहे.


एकाचवेळी अंतराळात शंभर उपग्रह झेपावणार
प्रत्यक्षात 7 फेब्रुवारी रोजी रामेश्वरम येथून हे 100 उपग्रह अंतराळात एकाचवेळी झेपावणार आहेत. भुसावळ शहरातील 11 बाल वैज्ञानिकांनी नुकतेच तज्ज्ञ संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली सहा दिवसांचे उपग्रह निर्मितीविषयक प्रशिक्षण पूर्ण केले आहे. यामध्ये स्पेस रीसर्च पेलोड क्यूब या उपग्रहाचा अर्थ, विविध भाग त्यांचे कार्य कसे चालते? याविषयी माहिती देण्यात आली. हेलियम बलून, सेंसर सॉफ्टवेअर, कार्यप्रणाली व मिळणारे परीणाम याविषयी मराठीतूनच माहिती देण्यात आली.
जगातील सर्वात कमी वजनाचे (25 ग्रॅम ते 80 ग्रॅम वजनाचे) 100 उपग्रह बनवून त्यांना 35 ते 38 हजार मीटर उंचीवर हाय अल्ट्टीट्युड सायंटिफिक बलूनद्वारे प्रस्थापीत केले जाणार असल्याची माहिती या प्रकल्पाच्या महाराष्ट्र समन्वयक मनीषा चौधरी यांनी दिली.

भुसावळातील 11 बालवैज्ञानिकांची निवड
इतिहासात पहिल्यांदाच जागतिक विक्रमासाठी शहरातील 11 बालवैज्ञानिकांची निवड व्हावी ही शहरासाठी गौरवाची बाब मानली जात आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड करणार्‍या या महत्त्वाकांक्षी मोहिमेत जागतिक विक्रमासाठी
शहरातील नाहाटा महाविद्यालयातील शिवम शैलेंद्रकुमार भंगाळे, वैभव नामदेव रत्नपारखी, सागर सचिन सरोदे, खुशाल शरद पाटील तसेच के.नारखेडे विद्यालयातील समीक्षा नितीन पाटील, पोदार इंटरनॅशनल स्कूलमधील अर्णव नितीन पाटील, प्रणव दीपक महाजन, या बरोबर सोहम राजेश वाणी, नेत्रज प्रशांत चौधरी, सुमीत गजानन निवे, जिया जावेद तडवी या 11 बाल वैज्ञानिक विद्यार्थ्यांची टीम सज्ज झाली आहे. देशाच्या एक हजार विद्यार्थ्यांमध्ये जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी एवढ्या मोठ्या संख्येने मोहिमेत नेतृत्व करत आहेत यामुळे त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. जागतिक पातळीवर सहभागाने विद्यार्थ्यांसह जिल्ह्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !