ग्रा.पं.निवडणूक : दुपारनंतर लागल्या मतदारांच्या रांगा


भुसावळ तालुक्यात 24, रावेर 48 तर बोदवड 29 ग्रामपंचायतीसाठी शांततेत मतदान : पोलिस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त

भुसावळ : भुसावळ तालुक्यातील 24, रावेर तालुक्यातील 48 तर बोदवड तालुक्यातील 29 व मुक्ताईनगर तालुक्यातील 47 ग्रामपंचायतीसाठी शुक्रवार, 15 रोजी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली तर विभागात सरासरी 65 टक्क्यांपुढे मतदान झाल्याचा अंदाज आहे. सकाळी मतदारांचा अल्प उत्साह असलातरी दुपारनंतर अनेक भागात मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. काही ठिकाणी लक्ष्मी दर्शन झाल्याच्या चर्चा रंगल्या तसेच निवडणुकीत कोण बाजी मारणार? याबाबत ग्रामीण भागात पैजा लागल्या आहेत. दरम्यान, 18 रोजी होणार्‍या मतमोजणीनंतर उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार असून आता निवडणुकीत कोण बाजी मारते? याकडे लक्ष लागले आहे.

भुसावळ तालुक्यात 56.81 टक्के मतदान
भुसावळ : भुसावळ तालुक्यातील 24 ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 56.81 टक्के मतदारांनी हक्क बजावला. 42 हजार 609 मतदारांनी मतदान केल्याचे सूत्रांनी सांगितले. 24 ग्रामपंचायतीच्या 224 जागांसाठी 560 उमेदवार रींगणात असून तालुक्यातील शिंदी व कठोरे बु.॥ या दोन ग्राम पंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. दरम्यान, दुपारनंतर अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होते शिवाय अखेरच्या अर्ध्या तासात कोरोना संशयीत रुग्णांना मतदानासाठी मुभा देण्यात आली होती. निवडणुकीदरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही वा ईव्हीएम बंद पडले नसल्याचे नायब तहसीलदार संजय तायडे यांनी सांगितले.


रावेर तालुक्यात 74 टक्के मतदान
रावेर : तालुक्यातील 48 ग्रामपंचायतीच्या 320 जागांसाठी 759 उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी ईव्हीएम यंत्रात बंद झाले. प्रशासनाच्या माहितीनुसार दुपारी साडेतीन वाजेपर्यंत रावेर 73.65 टक्के मतदान झाले. तालुक्यात राजकीयदृष्टय महत्वाच्या गावातील निवडणूक अतिशय अटीतटीची व चुरशीची झाली. भोर येथे मतदानासाठी येणार्‍या मतदारांना निवडणूक चिन्हाच्या चिठ्ठ्या वाटप करीत असल्याच्या कारणावरून प्रतिस्पर्धी उमेदवाराने आक्षेप घेतला यामुळे येथील मतदान केंद्र अर्धा तास बंद करण्यात आले होते. मतदान केंद्रांवर सॅनिटायझर, थर्मामीटरने तपासणी होताना दिसून आली. शुक्रवारी सकाळी सर्वत्र शांततेत मतदानाला सुरुवात झाली. मोरगाव खुर्द, केर्‍हाळा बुद्रुक, विवरा बुद्रुक, विवरा खुर्द, निंबोल, ऐनपूर, तांदलवाडी रसलपूर, धामोडी या गावात अतिशय अटीतटीची व चुरशीची निवडणूक झाली. भोर येथील उमेदवार मतदारांना निवडणूक चिन्हाच्या चिट्ठ्या देत असल्याचा आक्षेप दोन उमेदवारांनी घेतल्याने या ठिकाणी गर्दी झाल्याने गोंधळ निर्माण झाला होता. या कारणाने दुपारी अडीच ते तीन वाजेपर्यंत येथील मतदान केंद्र क्रमांक तीन बंद करण्यात आले होते. येथे तत्काळ नायब तहसीलदार एम.जे.खारे व सी.जी.पवार आल्यावर केंद्र सुरू करण्यात आले. उपनिरीक्षक मनोज वाघमारे व सहकारी तत्काळ केंद्रावर पोहचल्याने मतदान केंद्राजवळ झालेली गर्दी हटवण्यात आली. मोरगाव येथे जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष योगीराज पाटील, काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते व बाजार समितीचे माजी सभापती डॉ.राजेंद्र पाटील यांनी तर तांदलवाडी येथे जिल्हा परीषद माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, बाजार समितीचे सभापती व सरपंच श्रीकांत महाजन, निंबोळी येथे पंचायत समितीचे सभापती जितू पाटील, धामोडी येथे माजी आमदार अरुण पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला.

यावल तालुक्यात 65.61 टक्के मतदान
यावल : तालुक्यातील 46 ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत दुपारी साडेती वाजेपर्यंत एकूण 65.61 टक्के मतदान झाले. शुक्रवारी सकाळच्या 7.30 वाजेपासुन 179 मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाले. या मतदानात 62 हजार 344 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला तर यात 31 हजार 635 पुरुषांसह 30 हजार 709 स्त्री मतदारांनी हक्क बजावला. सायंकाळनंतर मतदारांची गर्दी वाढल्याने मतदानाची अंतीम टक्केवारी वाढण्याची आशा आहे. निवडणूक निरीक्षक व्ही.व्ही.बादल यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुका निवडणूक निर्णय अधिकारी महेश पवार यांनी विविध मतदान केंद्रावर भेटी देत पाहणी केली.

बोदवड तालुका : 66.46 टक्के मतदान
बोदवड : तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 66.46 टक्के मतदान झाले तर सायंकाळनंतर मतदानाची टक्केवारी वाढण्याची आशा आहे. निवडणुकीसाठी 380 उमेदवारी रींगणात असून 237 उमेदवार निवडीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

मुक्ताईनगर तालुका : 69.92 टक्के मतदान
मुक्ताईनगर : तालुक्यातील 47 ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया शांततेत आटोपली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 69.92 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक सूत्रांनी सांगितले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !