कामचुकार ग्रामसेवकांवर गटविकास अधिकार्यांनी कारवाई करावी
आमदार चंद्रकांत पाटील : घरकुलांबाबत बोदवड पंचायत समितीत बैठक
बोदवड : पंचायत समिती सभागृहात आमदार चंद्रकांत पाटील यांनी तालुक्यातील घरकुलांसह शासकीय जागेवरील अतिक्रमित घरकुल कायम करण्याबाबत पंचायत समिती गटविकास अधिकारी संतोष नाथतीळक, नगरपालिका मुख्याधिकारी भोसले तसेच सर्व विस्तार अधिकारी व ग्रामसेवकांच्या उपस्थितीत बैठक घेतली. घरकुलांचे सर्व लाभार्थी लक्ष पूर्ण करण्यासाठी विशेष लक्ष देण्यासह सर्व ग्रामसेवकांनी आपली जबाबदारी समजून घेऊन गावाच्या विकासासाठी पूर्णतः प्रयत्नरत राहावे तसेच कामचुकार ग्रामसेवकांवर गटविकास अधिकार्यांनी तत्काळ कारवाई करून अहवाल सादर करावा अशा सूचना आमदारांनी केल्या.
रमाई घरकुल उद्दिष्ट परत गेल्याने गदारोळ
तालुक्यात गेल्या पाच वर्षांपासून विकास कामांवरील निधीचा खर्च, निधी खर्च वापर, अखर्चित निधी, शिल्लक निधी, याविषयी माहिती घेतली तसेच नगरपालिका क्षेत्रातील लाभार्थींना उपलब्ध जागांचे सीमांकन तसेच मोजणी शासकीय खर्चातून योग्यप्रकारे करून विशेष सूचना दिल्या. बैठकीत रमाई घरकुल उद्दिष्ट परत गेल्यासंबंधी गदारोळ झाला. त्या संबधी आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्वरीतत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीत ग्रामसेवकांच्या रीक्त पदांची पूर्तता करण्या विषयी आमदारांकडे मागणी करण्यात आली. आमदारांनी तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच माझे उद्दिष्ट असून यासाठी मला सर्व अधिकारी , कर्मचारी सर्व जनता यांची साथ हवी आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यांची बैठकीला उपस्थिती
पंचायत समिती सभापती किशोर गायकवाड, पंचायत समिती उपसभापती प्रतिभा निलेश टिकार, पंचायत समिती सदस्य गणेश पाटील, गटविकास अधिकारी नाथटिळक, मुख्याधिकारी भोसले, विस्ताराधिकारी, सर्व ग्रामसेवक, मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, दीपक माळी, सचिन पाटील, लालसिंग पाटील, सागर पाटील, ईश्वर जंगले, स्वीय सहाय्यक प्रशांत पाटील यांची उपस्थिती होती.


