नागादेवी पाझर तलावासाठी गेलेल्या शेतजमिनीचा मोबदला मिळावा
दहिगाव, ता.यावल : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या नागादेवी पाझर तलावाच्या कामासाठी शासनाने शेतकर्यांकडून घेतलेल्या शेतजमिनीचा मोबदला शेतकर्यांना अद्याप मिळालेला नसल्याने तो त्वरीत मिळावा, अशी मागणी किसन रुपचंद बडगुजर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. नागादेवी पाझर तलावाचे कामासाठी सावखेडासीम शिवारातील शेत गट नंबर 125 मधील पाचशे एकर शेत जमीन गेलेली आहे. या जमिनीच्या मोबदल्यात शासनाकडून वेळोवेळी तक्रारी करून केल्यावर मोबदल्याची रक्कम तुटपुंजी मिळाली जी शेतकर्यांची कुठलीही गरज भागवू शकत नाही. सर्व बाजूने विचार करून शासनाने या तलावात गेलेल्या शेत जमिनीचा मोबदला द्यावा, अशी मागणी किसन बडगुजर यांनी केली. किसन बडगुजर अल्पभूधारक भूमिहीन असून अल्पसंख्यांक जातीचे असून सध्या गुडघेदुखी व इतर आजाराने त्रस्त आहेत. या सर्व बाबींचा विचार करीत जमिनीचा मोबदला तत्काळ मिळावा, अशी मागणी बडगुजर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे 29 डिसेंबर रोजी केलेली आहे मात्र अद्यापही या तक्रारीची दखल घेण्यात आलेली नसल्याने शेतकरी शासनावर नाराज होत आहेत.


