वीर जवान सागर धनगर यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन
जळगाव : कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झालेले चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे बुद्रक येथील जवान सागर धनगर यांच्या कुटूंबियांची आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट घेऊन सात्वंन करुन शोक व्यक्त केला. सेनापती (मणिपूर) भागात कर्तव्य बजावत असताना तांबोळे गावचे सुपुत्र, 5 मराठा इंन्फ्रन्ट्री बटालियनचे जवान सागर धनगर यांना 31 जानेवारी रोजी वीरगती प्राप्त झाली. आज पालकमंत्री पाटील यांनी वीरजवान सागर धनगर यांच्या मुळगाव तांबोळे येथील घरी जाऊन त्यांची आई रत्नाबाई, भाऊ अशोक धनगर यांच्यासह नातेवाईक व ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांचे सात्वंन केले.
बलिदान व्यर्थ जाणार नाही
वीरजवान सागर धनगर यांना भारतमातेची सेवा करीत असताना वीरगती प्राप्त झाली आहे. त्यांनी देशाच्या सेवेसाठी दिलेले बलीदान व्यर्थ जाणार नाही. वीरजवान सागर धनगर यांच्या कुटूंबियांना शासनातर्फे सर्वोतोपरी मदत करण्यात येईल. असेही पालकमंत्री पाटील यावेळी म्हणाले.

यांची होती उपस्थिती
यावेळी तहसीलदार अमोल मोरे, जि.प.चे माजी सदस्य भाऊसाहेब जाधव, देविदास जाधव, रमेश आबा चव्हाण, महेंद्र पाटील, नानाभाऊ कुमावत, दिलीप घोरपडे, सुनील गायकवाड, माजी नगरसेवक नंदकिशोर बाविस्कर, रामेश्वर चौधरी, निलेश गायके, राजेश भालेराव, मनोज कूमावत, भीमराव कलाने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


