दिनेश नेमाडेंना डच्चू : परीक्षीत बर्‍हाटे भाजपा शहराध्यक्षपदी


भुसावळ : वीज बिल माफीसाठी भाजपने जिल्हाभर महावितरणच्या कार्यालयांना टाळा ठोको आंदोलन केले असलेतरी भुसावळसह मुक्ताईनगरात मात्र आंदोलन झालेच नाही. भुसावळात खडसे समर्थक शहराध्यक्षांची उचलबांगडी होत नसल्याचे कारण यामागे असल्याचे समोर आल्यानंतर निष्ठावान भाजपेयींमधून दिनेश नेमाडे यांना हटवण्याची मागणी पुढे आली होती. पक्षानेदेखील ही बाब गांभीर्याने घेत शनिवारी शहरातील लोणारी समाज मंगल कार्यालयात आयोजित बुथ समितीच्या बैठकीत भाजपा शहराध्यक्ष दिनेश नेमाडे यांना डच्चू देत त्यांच्या जागी माजी नगरसेवक व रेल्वे सल्लागार समिती सदस्य परीक्षीत बर्‍हाटे यांची नेमणूक करण्यात आल्याची घोषणा आमदार राजूमामा भोळे यांनी केली.

पक्ष बळकटीकरणाचे पदाधिकार्‍यांचे आवाहन
बुथ समितीच्या बैठकीत आमदार राजूमामा भोळे म्हणाले की, निवडणुका आल्यावरच कामे करावे, असे नाही तर नेहमीच पक्षासाठी सतत कार्यरत राहण्याची गरज आहे. आमदार संजय सावकारे यांनी पक्ष बळकटीकरणाचे आवाहन केले.



यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर खासदार रक्षा खडसे, आमदार राजूमामा भोळे, आमदार संजय सावकारे, राजेंद्र आवटे, राजेंद्र नाटकर, युवराज लोणारी, निकी बत्रा, अजय नागराणी, गिरीश महाजन, सतीश सपकाळे, मनोज बियाणी, माजी सभापती राजेंद्र पुंडलिक चौधरी, रमाशंकर दुबे, भाजपा तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील आदींची उपस्थिती होती.

खडसे समर्थकांची पाठ
कागदोपत्री भाजपात असलेले मात्र मनाने माजी मंत्री खडसेंसोबत असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याचे आजच्या बैठकीत दिसून आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !