कोरोनाच्या काळात रेल्वे हॉस्पीटलसह अन्य विभागांचे कामे ठरली महत्वपूर्ण
डीआरएम विवेककुमार गुप्ता : रेल्वे सप्ताहानिमित्त पुरस्काराचे वितरण
भुसावळ : कोरोना संसर्गाच्या काळात रेल्वे हॉस्पीटलसह अन्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी चांगली कामे केली, त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून आज हे डीआरएम अवॉर्ड त्यांना दिले जात आहे. अन्य कर्मचार्यांनी सुध्दा चांगले काम करून पुढच्या वर्षी अवॉर्ड मिळवावे, असे प्रतिपादन डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी केले. कृष्णचंद्र हॉलमध्ये 65 व्या रेल सप्ताहनिमित्त शुक्रवारी झालेल्या अवार्ड वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
यांची होती उपस्थिती
कृष्णचंद्र हॉलमध्ये डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमास मध्य रेल्वे महिला कल्याण संगठण अध्यक्षा नीता गुप्ता, एडीआरएम मनोज कुमार सिन्हा आदींची उपस्थिती होती. यावेळी इलेक्ट्रॉनिक्स, सिग्नल अॅड टेलिकॉम विभाग, मेडीकल विभाग, इजिनिअरींग विभाग, ऑपरेटींग विभाग, सी अॅण्ड डब्ल्यू विभाग, वाणिज्य विभाग, आणि कार्मीक विभाग या विभागातील कर्मचार्यांना अवॉर्ड देण्यात आले. वरीष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे यांनी प्रास्तावीक केले तसेच एडीआरएम मनोजकुमार सिन्हा यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेल्वे स्कूलचे प्राचार्य सतीश कुळकर्णी यांनी केले.

भुसावळात 169 कर्मचार्यांना अवॉर्ड प्रदान
भुसावळ येथे झालेल्या कार्यक्रमात 169 रेल्वे कर्मचार्यांना अवॉर्ड देण्यात आले तर 81 कर्मचार्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी अवॉर्ड तेथील अधिकार्यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर यंदा बाहेर गावच्या कर्मचारी, अधिकारी यांना त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी अवॉर्ड दिले गेले. विविध विभागांच्या सात गृपला प्रत्येकी साडेसात हजार रूपयांचे रोख पुरस्कार दिलेे तर विविध विभागाातील दहा डेपोंना सुध्दा डीआरएम शिल्ड आणि प्रत्येक साडेसात हजार रूपये रोख असा पुरस्कार देण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रम सादर
अवॉर्ड कार्यक्रमाच्या ठीकाणी डीआरएम गुप्ता यांचे मनोगत व्यक्त केल्यानंतर 45 मिनिटांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते रेल्वे स्कूलमधील विद्यार्थी-विद्यार्थीनींनी नृत्य सादर केले. यावेळी विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती.


