राष्ट्रवादीत येणार्यांना संरक्षण देणार : जलसंपदा मंत्री जयंत पाटील
खान्देशात आता स्व.यशवंतराव चव्हाणांप्रमाणे बेरजेचे राजकारण : खडसेंचे नेतृत्व सक्षम
भुसावळ : नाथाभाऊ राष्ट्रवादीत आल्याने पक्षाला आता चिंता नाही. गेल्या दोन टर्म पासून जिल्ह्यात केवळ एकच आमदार राष्ट्रवादीचा निवडून येत असून मागे राष्ट्रवादीत असलेले उमेदवारही खडसे समर्थक असल्याने (आमदार संजय सावकारे नाव न घेता) भाजपात गेले मात्र आता नाथाभाऊ राष्ट्रवादीत आल्याने असे घडणार नाही. राष्ट्रवादीत येणार्यांचे स्वागत असून पक्ष त्यांना पूर्णपणे संरक्षण देईल, असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी येथे व्यक्त केले. शहरातील तेली समाज मंगल कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी त्यांनी कार्यकर्ते व पदाधिकार्यांना मार्गदर्शन केले.
जलसंपदा मंत्र्यांचे जंगी स्वागत
जयंत पाटील यांचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी व फुलांची उधळण करून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. कृउबा सभापती सचिन संतोष चौधरी यांनी भला मोठा गुलाबाच्या फुलांच्या हाराने पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.


यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, माजी आमदार संतोष चौधरी, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक अध्यक्ष मेहबूब शेख, युवती सभेच्या अध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी सेलचे अध्यक्ष सुनील गव्हाणे, युवा कार्याध्यक्ष रवी वरपे, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, आमदार अनिल पाटील, माजी आमदार मनीष जैन, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक, बाजार समिती सभापती सचिन चौधरी, माजी नगराध्यक्ष तथा ओबीसी सेलचे उमेश नेमाडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे, सतीश घुले, धीरज चौधरी, जय चौधरी, आदींची उपस्थिती होती.
जिल्ह्यात बेरजेचे राजकारण करणार
जयंत पाटील म्हणाले की, स्व.यशवंतराव चव्हाण यांनी ज्या पद्धत्तीने बेरजेचे राजकारण केले तेच राजकारण आता जिल्ह्यात केले जाणार आहे. नाथाभाऊ हे सक्षम नेते व नेतृत्व असून त्यांच्यावर भाजपात अन्याय झाला हे आम्ही व राज्यातील जनतेने देखील म्हटले मात्र पक्षाने त्यांना समजून घेतले नाही. स्वाभिमानी माणूस अन्याय सहन करू शकत नाही म्हणून खडसेंनी देखील पक्ष सोडला मात्र आता खडसेंच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढल्याचे ते म्हणाले. भुसावळ हे जंक्शन शहर असल्याने येथील प्रश्न किचकट असलेतरी ते निश्चित सोडवणार असल्याचेही ते म्हणाले.
हे देखील वाचा : गद्दारांचे जुने हिशेब चुकते करणार : माजी मंत्री खडसे
