पुरी एक्स्प्रेसमध्ये चोरट्याने टीसीची बॅग लांबवली
भुसावळ : अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेसमध्ये ए-1 या डब्यात कर्तव्यावर असताना टीसीची बॅग चोरट्याने लांबवल्याची घटना रविवारी रात्री 10.40 वाजता घडली. चोरीच्या वेळी संबंधित टीसी सूरत स्थानकावर आरक्षण चार्ट घेण्यासाठी खाली उतरले होते. बॅगेत एटीएम कार्ड स्वॅप मशीन होते. पुरी एक्स्प्रेसमधील तिकीट निरीक्षक कमलेश प्रफुल्ल जोशी (रा. अहमदाबाद) हे भुसावळपर्यंत ड्युटीवर होते. सुरत रेल्वे स्थानक आल्यावर ते आरक्षण चार्ट घेण्यासाठी गाडीच्या खाली उतरले होते. ही संधी साधत चोरट्याने त्यांची बॅग लांबवली. बॅगेत 15 हजार रुपयांचे साहित्य होते. या प्रकरणी तिकीट निरीक्षक जोशी यांनी भुसावळात आल्यावर येथील जीआरपी पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. भुसावळ जीआरपीने गुन्हा दाखल करून सुरत जीआरपी पोलिस ठाण्याकडे वर्ग केला.

