‘संत गोरोबा काका महामंडळ’ स्थापन करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार : आमदार अमोल जावळे

यावल शहरात कुंभार समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव


यावल (रविवार, 30 ऑगस्ट 2026) : कुंभार समाजाचे आराध्य संत गोरोबा काका यांच्या नावाने ‘संत गोरोबा काका महामंडळ’ स्थापन करण्यासाठी शासन स्तरावर आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही रावेर-यावल तालुक्याचे आमदार अमोल जावळे यांनी येथे दिली.

यावल-रावेर परिसर कुंभार समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गौरव, समाजभूषण पुरस्कार तसेच सामाजिक, साहित्यिक व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणार्‍या समाजबांधवांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार अमोल जावळे यांनी कुंभार समाजाच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक भूमिका मांडली.


विद्यार्थी व युवकांनी विविध क्षेत्रात पुढे यावे
आमदार जावळे म्हणाले की, समाजातील विद्यार्थी व युवकांनी शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधावी. विविध क्षेत्रांत पुढे यावे आणि समाजाच्या विकासात आपले योगदान द्यावे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन आमदारांनी दिले.

यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी यावल-रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे होते. प्रमुख पाहुण्या म्हणून यावल नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया अतुल पाटील उपस्थित होत्या.

या मान्यवरांचा सन्मान
या कार्यक्रमात शिक्षण, सामाजिक, साहित्यिक तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणार्‍या समाजबांधवांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी रामभाऊ यादव पुन्नासे, अनंत तुकाराम कुंभार, भगवान रामदास कुंभार, गोकुळ रामदास कुंभार, वसंतराव पुंडलिक गाडेकर (कुंभार), सीताराम भगवान प्रजापती, भीमराव जालम पंडित यांना ‘समाजभूषण पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. निंबा पुंडलिक कुंभार यांना त्यांच्या साहित्यीक योगदानाबद्दल ‘साहित्यिक पुरस्कार’, तर कै. ब. ना. गुरुजी यांना त्यांच्या कार्याची दखल घेत ‘मरणोत्तर जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विवरे व यावलच्या सभागृहासाठी आमदारांचे आभार
समाजबांधवांनी आमदार अमोल जावळे यांनी कुंभार समाजाच्या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी सभागृह उभारणीसाठी विवरे व यावलला निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले. विवरे येथे सभागृहासाठी 20 लाख रुपये तसेच यावल येथे सभागृहासाठी 17 लाख रुपये निधी मंजूर करून दिल्याबद्दल समाजबांधवांनी आमदार अमोल जावळे यांचे अभिनंदन केले. समाजाच्या कार्यक्रमांसाठी स्वतंत्र सभागृहाची आवश्यकता लक्षात घेऊन निधी उपलब्ध करून दिल्याने समाजाच्या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना निश्चितच बळ मिळेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

ध्येय निश्चित करा : नगराध्यक्षा छाया पाटील
यावलच्या नगराध्यक्षा छाया पाटील म्हणाल्या की, कुंभार समाज हा कष्टाळू, मेहनती आणि स्वाभिमानी समाज म्हणून ओळखला जातो. आपल्या आई-वडिलांनी आयुष्यभर केलेले कष्ट, मेहनत आणि संघर्ष विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवावा. त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यातील ध्येय निश्चित करावे आणि ते साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. शिक्षण हेच आपल्या पुढील पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वात मोठे साधन आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाला प्राधान्य देत मोबाईलपासून दूर राहावे आणि आपल्या आई-वडिलांचे, कुटुंबाचे तसेच समाजाचे नाव उज्ज्वल करावे, असेही छाया पाटील यांनी सांगितले.

गुणवंतांसह समाजातील कर्तृत्ववानांचा गौरव
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करण्यात आले. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आल्याने उपस्थित समाजबांधवांनी समाधान व्यक्त केले.

यांच्या पुढाकारातून उपक्रम
आयोजन घनश्याम प्रभाकर हरणकार, रवींद्र भादू प्रजापती, विजय देविदास पंडित, रवींद्र मोहन मोरे, सतीश लिलाधर कापडे, संजय गंभीर हरणकार यांच्या पुढाकारातून करण्यात आले. कार्यक्रमास कुंभार समाजातील पदाधिकारी, युवक, विद्यार्थी, पालक, गुणवंत विद्यार्थी, समाजबांधव तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक वेशभूषा आणि उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमामुळे समाजात नवचैतन्य निर्माण झाले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !