मीरा-भाईंदर, वसई-विरार गुन्हे शाखेची जळगावात मोठी कारवाई : सव्वा कोटींच्या एम.डी.सह दोघे जाळ्यात
जळगाव (सोमवार, 31 ऑगस्ट 2026) : जळगावात पाच किलो एम.डी.ड्रग्ज सप्लाय केल्याची पक्की माहिती मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-4 च्या पथकाला 14 संशयीतांच्या अटकेदरम्यान मिळाली होती. या माहितीच्या जोरावर पथकाने गुरुवारी जळगावात छापा टाकत सव्वा कोटी रुपये किंमतीच्या पाच किलो एम.डी.सह मेहरुण आणि उस्मानिया पार्क परिसरातून दोघांना अटक केली. या कारवाईने ड्रग्ज माफियांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.
रहिम ताहेर पिंजारी (28) व सैय्यद मुशादूर अली मुमताज अली (29, रा. जोशी पेठ, श्री पंत नगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेहरुण परिसरातील रहिम पिंजारी याच्याकडे छापा मारताच त्याने ड्रग्ज सैय्यद अलीच्या घरात ठेवल्याची कबुली दिली. गुन्हे शाखा पथकाने स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह पथकाला सोबत घेऊन गुरुवारी पहाटे छापा टाकत कारवाई केली.

