बीएचआर ठेवीदारांना ठेव परत मिळण्याची आशा


जिल्हाधिकार्‍यांनी दिले बँक खाते गोठवण्याचे आदेश

भुसावळ : राज्यभर बीएचआर संस्थेचा भ्रष्टाचार गाजत असताना दुसरीकडे 11 तक्रारदारांनी ठेव रक्कम मिळण्यासंदर्भात ग्राहक मंचात तक्रार दाखल केल्यानंतर ग्राहक मंचने ठेवीदारांच्या बाजूने निकाल दिला आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने जळगाव तहसीलदार संबंधित संस्थेचे बँक खाते गोठवण्याची कारवाई करून ठेवी रक्कम वसुल करणार असल्याने ठेवीदारांना न्याय मिळण्याची आशा व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे दोन तक्रारदारांनी बँक खाते जप्तीबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली होती.

बीएचआरच्या ‘त्या’ ठेवीदारांच्या आशा पल्लवीत
या संदर्भात अ‍ॅड.राजेश उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रकाश सरताळे यांची तीन लाख 38 हजार 697 तर ईश्‍वर तेली यांची एक लाख 65 हजार 275 रुपयांची वसुल रक्कम बीएचआर पतसंस्थेतून मिळत नसल्याने ग्राहक मंचात तक्रार दाखल करण्यात आली होती. या अनुषंगाने सुनावणी होवून जिल्हाधिकार्‍यांमार्फत रक्कम वसुलीचे आदेश ग्राहक मंचाने पारीत केले होते. ग्राहकांच्या बाजूने निकाल लागल्यानंतर वसुलीची कारवाई जिल्हाधिकार्‍यांकडे वर्ग करण्यात आली व त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी तहसीलदारांना पत्र देवून वसुली कारवाई करण्याचे नोव्हेंबर 2019 मध्ये सूचित केले होते. जळगाव तहसीलदारांनी जिल्हाधिकार्‍यांकडून संस्थेचे बँक खाते जप्तीबाबत मार्गदर्शन मागितले होते. जिल्हाधिकार्‍यांनी अधिकार क्षेत्रात कसूर संस्थेचे बँक खाते आहे वा नाही ? याबाबत पडताळणी करून तत्काळ वसुलीची कारवाई करण्याचे आदेश दिल्याने आता जळगाव तहसीलदारांकडून वसुलीची कारवाई तत्काळ होण्याची शक्यता असल्याने ठेवीदारांना न्याय मिळण्याची आशा आहे. ठेवीदारांतर्फे भुसावळचे अ‍ॅड.राजेश उपाध्याय यांनी काम पाहिले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !