रावेरात कोरोनाची स्थिती नियंत्रणात : प्रशासन मात्र सज्ज
रावेर : रावेर शहर व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव न वाढण्यासाठी नगरपालिका व पंचायत समिती प्रशासनातर्फे खबरदारी घेतली जात आहे. रावेर नगरपालिका हद्दीत सध्या दोन कोरोना अॅक्टीव्ह रुग्ण असून ग्रामीण भागात पाच रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. रुग्ण संख्या न वाढण्यासाठी शहरात मुख्याधिकारी व ग्रामीण भागात गटविकास अधिकार्यांकडून खबरदारी घेतली जात आहे.
कुशल प्रशासनामुळे कोरोना नियंत्रणात
रावेर नगरपालिका व पंचायत समितीच्य कुशल प्रशासनामुळे कोरोना नियंत्रणात आहे. नागरीकांनी बाहेर पडताना तोंडाला मास्क लावावा तसेच सॅनिटायझरचा वापर करावा तसेच गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्स पाळावे, असे आवाहन नगरपालिका व पंचायत समितीतर्फे करण्यात आले आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी मास्क वापरण्यासाठी शहरात सहा पथके तयार केले असून पाच मंगल कार्यालयांना नोटीसा दिल्या आहे तर कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी बंधनकारक करण्यात आले आहे.

ग्रामीण भागात कोरोनाची स्थिती अनुकूल
रावेर ग्रामीण भागातदेखील कोरोना आटोक्यात असून पाच रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. रावेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी खबरदारी म्हणून सूचना केल्या आहेत तसेच ग्रामपंचायत स्तरावर पथके तयार करण्यात येणार असून विना मास्क फिरणार्यांवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी ग्रामसेवकांना दिल्या आहे. नागरीकांनीदेखील खबरदारी घ्यावी व घराबाहेर निघतांना मास्क लावावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
यापुढे परवानगी बंधनकारक
रावेर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना बंधनकारक करण्यात आल्या असून लग्न समारंभ व अंत्यविधी तसेच इतर कार्यक्रमांना परवानगी घेणे बंधनकारक आहे. एकाचवेळी 50 पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे. भाजीपाला मार्केट, शॉपींग कॉम्प्लेक्स, मॉल या ठिकाणी दुकानदारांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा व एका वेळेस पाच ग्राहकच उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. जे ग्राहक व नागरीक मास्कचा वापर करणार नाही, त्यांना 500 रुपये दंड करण्यात येणार असल्याचे पालिका व पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
