21 लाखांचा गुटखा जप्त : तिघा आरोपींना अटक
जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे बुलढाणा जिल्ह्यातील तीन संशयीतांकडून तब्बल 21 लाख 22 हजार 720 रुपयांचा गुटखा जप्त केला. चारचाकी वाहनातून गुटख्याची तस्करी करताना शनिवारी ही कारवाई करण्यात आली. गाडी चालक – गोविंदा विश्वनाथ बाविस्कर (21), क्लिनर गोविंदा पांडुरंग आखरे (21) व गजानन पांडुरंग दहीकर (रा. टुणकी, ता. संग्रामपुर, जि. बुलडाणा) असे अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर येथे मोठ्या प्रमाणात गुटख येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक सुधाकर लहारे, अशरफ शेख, सुनील दामोदरे, जितेंद्र पाटील, प्रीतम पाटील, दीपक पाटील, दीपक शिंदे, दीपक चौधरी यांच्या पथकाने अंतुर्ली फाट्यावर सापळा रचला. संबधित चारचाकी अंतुर्ली फाट्यावरील बस स्टॉप जवळ येताच तिची तपासणी करण्यात आली. यावेळी चारचाकीतून मोठ्या प्रमाणात गुटखा मिळुन आला. या प्रकरणी तीघांवर मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

