भुसावळात डीजे जप्त : चार मंगल कार्यालय चालकांना दंड
जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघण केल्याने भुसावळात पोलिस व पालिका प्रशासनाच्या धडक कारवाईने उडाली खळबळ
भुसावळ : शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने पालिका व पोलिस प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून मास्क न लावणार्या नागरीकांवर कारवाईचा धडाका सुरू असतानाच रविवारी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व पालिका मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी शहरातील चार मंगल कार्यालयात 50 वर वर्हाडी जमल्याने प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड सुनावल्याने मंगल कार्यालय चालकांमध्ये खळबळ उडाली तर डीजेला मनाई असताना डीजे सुरू असल्याने दोन डीजे जप्त करण्यात आले असून 50 वर वर्हाडी जमल्याने वधू पित्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
चार मंगल कार्यालय मालकांवर कारवाई
रविवारी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्यासह शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, सहा.पोलिस अधीक्षक अर्चित चांडक तसेच पालिका मुख्याधिकारी संदीप चिद्रवार व कर्मचार्यांनी शहरातील चार मंगल कार्यालयांमध्ये अचानक भेट देत 50 वर वर्हाडी जमल्याचे आढळल्याने प्रत्येकी पाच हजार रुपये दंड मंगल कार्यालयाच्या मालकांकडून जागेवरच वसुल केला तसेच खाजगी जागेतील विवाह सोहळ्यास 50 वर वर्हाडी जमल्याने वधू पिता प्रल्हाद लक्ष्मण पाटील (55, कोळीवाडा, भुसावळ) यांच्याविरुद्ध भादंवि 188 अन्वये शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पथकाने शहरातील स्टार लॉन, बालाजी लॉन, आदित्य लॉन व संतोषी माता मंगल कार्यालय चालकांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये तर श्रद्धा नगरातील लग्न मंडपातून वधू पित्याकडून दोन हजार रुपयांचा दंड वसुल केला.

दोन डीजे जप्त : दंडात्मक कारवाई होणार
जळगाव रोडवरील लोणारी समाज मंगल कार्यालयाजवळ रस्त्यावर डीजेच्या दणदणाटात वर्हाडी नाचत असतानाच पथकाने डीजे जप्त करीत शहर पोलिस ठाण्यात आणला तसेच अन्य भागातूनही एक डीजे जप्त केला आहे. डीजे चालकांवर जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कारवाई केली जाणार असून त्यासोबत वाहनात बेकायदेशीरपणे बदल (मॉडीफाईड) केल्याप्रकरणी उपप्रादेशिक विभागाला पत्र देवून स्वतंत्ररीत्या दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस उपअधीक्षक वाघचौरे म्हणाले.
