तस्लीम काल्याकडून चाकूसह लूटीतील आठ हजार जप्त
भुसावळ : शहरातील जामनेर रोडवर बळीराम बाणाईत (रा. मोरझिरा, ता. मुक्ताईनगर) यांना अडवून त्यांच्याकडून 15 हजार रूपये लूटल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी तस्लीम उर्फ काल्या शेख सलीम शेख व फिरोज शहा हसन शहा यांना अटक केली होती. आरोपींकडून पोलिसांनी लूटीतील 15 हजारापैकी आठ हजार रूपये आणि चाकू रविवारी जप्त केला. शहरातील दिनदयाल नगरासमोर जामनेर रोडवर मुक्ताईनगर तालुक्यातील मोरचिडा येथील बळीराम बाणाईत त्याच्या कामासाठी शहरात आले असता, दिनदयाल नगरजवळ जामनेररोडवर ते थांबून पत्ता विचारत असतांना त्यांना तस्लीम काल्या, फिरोज शहा यांच्यासह चार जणांनी मारहाण करून त्यांच्या जवळील 15 हजार रुपये जबरीने हिसकावून घेतले. याप्रकरणी पोलिसांनी तस्लीम काल्या आणि शहा यांना अटक केली होती. त्यांच्याकडून लूटीतील आठ हजार रूपयांची रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेला चाकू हस्तगत केला. या प्रकरणातील दोन संशयीत अल्पवयीन असल्याने त्यांना बाल सुधारगृहात रवानगी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, समाधान पाटील पुढील तपास करीत आहे.

