नेत्यांचा दावा ठरला फोल : हतनूरला राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्राला मंजुरी नाहीच !


भुसावळ : हतनूर येथील नियोजित राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक 19 अहमदनगर जिल्ह्यात पळवण्यात आल्यानंतर जिल्ह्यात राजकारण पेटले होते तर विविध पक्षांनी या संदर्भात आंदोलनदेखील मध्यंतरी छेडले होते मात्र प्रशिक्षण केंद्र नियोजित ठिकाणीच केंद्र सुरू राहणार असल्याचा दावा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला होता मात्र हे केंद्र अद्यापही मंजूर नसल्याची माहिती शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश उपाध्याय यांच्या अर्जानुसार मिळाली आहे. वरणगावातील हतनूर रोडवर राज्य राखीव पोलिस बल प्रशिक्षण केंद्राला 19 सप्टेंबर 2019 रोजी मंजुरी मिळाली होती मात्र प्रशासकीय कारणास्तव 16 जून 2020 रोजी हे केंद्र कुसडगाव (ता.जामखेड, जि.अहमदनगर) येथे हलवण्यात आले. यानंतर हतनूर येथे नव्याने राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्राला मंजुरी देण्यात आली नाही, असे सहाय्यक पोलिस महानिरीक्षक शीला साईल यांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

माजी मंत्री खडसेंच्या प्रयत्नांनी केंद्र झाले होते मंजूर
दरम्यान, सन 1995 मध्ये तत्कालीन मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नांनी वरणगावात पोलिस प्रशिक्षण केंद्र मंजूर झाले होते मात्र पोलिस प्रशिक्षण केंद्राची गरज नसल्याने 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी येथे राज्य राखीव पोलिस बल प्रशिक्षण केंद्राला मंजुरी मिळाली. कालांतराने हे केंद्रदेखील पळवले गेले. यावेळी झालेला विरोध पाहता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्र वरणगावातच होईल, असे सांगितले होते मात्र आरटीआय कार्यकर्ते उपाध्याय यांनी मिळवलेल्या माहितीनुसार, या पाठपुराव्याला अद्यापही यश आलेले नाही, असे समोर आले.

आता माजी मंत्री खडसे पुढाकार घेतील का?
16 जून 2020 रोजी पोलिस प्रशिक्षण केंद्र हलवल्यानंतर जिल्ह्याचे राजकारण पेटले होते. त्यावेळी भाजमध्ये असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सरकारमधील ‘पत’ दाखवून द्यावी, असे सांगत हे केंद्र परत आणण्याचे आव्हान दिले होते. आता खडसे हे स्वत:च सत्ताधारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. आता ते या केंद्रासाठी प्रयत्न करतील का? याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !