बोदवडमध्ये 75 लाखांचा रेशन घोटाळा उघड
सहकारी ग्रामीण महिला औद्योगिक संस्थेच्या चेअरमनसह सदस्यांवर गुन्हा दाखल
बोदवड : सहकारी ग्रामीण महिला औद्योगिक संस्थेच्या चेअरमनसह सदस्यांनी मे 2015 ते मे 2018 या कालावधीत तब्बल 75 लाख 75 हजार 816 रुपये किमतीच्या स्वस्त धान्याचा अपहार केल्याप्रकरणी बोदवड पोलिसात सात संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील मुनफ ठेकेदार युनुस बागवान यांनी 2015 मध्ये या प्रकरणी तक्रार केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली तर मंगळवारी पुरवठा निरीक्षक रसिक रत्नाकर सातपुते यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
शासकीय धान्याचा अपहार
पुरवठा निरीक्षक रसिक सातपुते यांच्या तक्रारीनुसार, शाहिदा परवीन गुलशन खा पठाण, व्हा.चेअरमन नासिया बानो हाफिज, गौसिया मतीन, रोहिना जुनेदखान पठाण, रहेनबी नाजीर बेग, सयमा परवीन हाफिज, कमळ संतोष पाटील यांनी मे 2015 ते मे 2018 या काळात तब्ब्ल 43 लाख 42 हजार 616 रुपयांचा गहू, 28 लाख आठ हजार 475 रुपयांची साखर मिळूण 75 लाख 75 हजार 816 रुपये किंमतीचा शासकीय धान्याचा अपहार केला. आरोपी महाराष्ट्रीय सहकारी ग्रामीण महिला औद्योगिक संस्थेचे चेअरमन व संचालक सदस्यांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. तपास उपनिरीक्षक भाईदास मालचे करीत आहेत.

