कोरोना काळातील वीज बिल माफ करा
वंचित बहुजन आघाडीचे साकडे : धडक वसुली मोहिम थांबवण्याची अपेक्षा
भुसावळ : गेल्या दहा महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे अनेकांचे रोजगार गेले असून छोटे व्यापारी, गरीब, मध्यमवर्गीय यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांच्यासमोर जगावे कसे? असा प्रश्न पडला आहे. नागरीकांना वीज बिल भरणे दुरापास्त असताना दुसरीकडे वीज कंपनीने सक्ती वीज वसुली सुरू केल्याने ही कारवाई थांबवावी तसेच कोरोना काळातील वीज बिल माफ करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे व पदाधिकार्यांनी वीज कंपनी प्रशासनाकडे केली आहे.
उर्जा मंत्र्यांनी शब्द फिरवला
उर्जा मंत्र्यांनी कोरोना काळातील वीज बिल माफ करणार, अशी घोषणा केली असलीतरी नंतर मात्र शब्द फिरवण्यात आला. पक्षाध्यक्ष माजी खासदार बाळासाहेब आंबेडकर यांनीदेखील सर्व सामान्य नागरीकांच्या न्याय हक्काची बाजू मांडत सरकारला वीज बिल माफ करा, असे आवाहन केले मात्र सरकारने दखल घेतली नाही. वीज कंपनीने वीज बिल माफ न करता उलट थकबाकीदारांकडे वसुली मोहिम सुरू करीत बिल न भरणार्या ग्राहकांचा वीज कनेक्शन कट करण्याचा सपाटा लावला आहे. तातडीने निवेदनाची दखल न घेतल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्ह्यासह राज्यभर आंदोलने केली जातील आणि याची सर्वस्वी जवाबदारी वीज वितरण कंपनी आणि महाराष्ट्र शासनाची राहील, असेही निवेदनात नमूद आहे. निवेदनावर वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, जिल्हा संघटक अरुण तायडे, देवदत्त मकासरे, निलेश जाधव, बंटी सोनवणे आदींच्या स्वाक्षर्या आहेत. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, उर्जा मंत्री, महाव्यवस्थापक तसेच जळगाव जिल्हाधिकारी यांनाही पाठवण्यात आली आहे.

