नगरपालिका कर्मचार्यांना कोरोना विमा कवचासह सानुग्रह सहाय्य लागू करा
भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे भुसावळात निवेदन : मृतांच्या वारसांना अनुदानाचीही मागणी
भुसावळ : पालिकेच्या कोरोना कर्मचारी योद्ध्यांसाठी विमा कवच तसेच सानुग्रह सहाय्य लागू करावे, अशी मागणी भाजप वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नी.तू.पाटील, भाजपा शहराध्यक्ष परीक्षित बर्हाटे यांनी मुख्याधिकार्यांकडे केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास प्रशासनाने कोरोनाचे कर्तव्य बजावताना संक्रमणामुळे मृत्यू झालेले अधिकारी, कर्मचार्यांची तसेच केंद्र किंवा राज्य सरकारने लागू केलेल्या कोरोना विमा कवच लाभाविषयी 11 मुद्यांवर माहिती मागितली आहे. तसेच विमा योजना राबवण्याची सूचना दिली आहे. भुसावळ पालिका अ वर्ग असूनही आजपर्यंत या शासन निर्णयावर कार्यवाही झालेली नाही. कोरोना महामारीत सेवा देताना जे कर्मचारी संक्रमण होऊन मृत झाले. त्यांच्याबद्दल पालिकेला आस्था नाही. मात्र आता किमान कोरोनाच्या दुसर्या लाटेची भीती पाहता पालिका कर्मचारी वर्गाला केंद्र व राज्य सरकारसारखे विमा कवच द्यावे. शहीद झालेले कोरोना योद्धा प्रकाश दुरकुले आणि विजयसिंग राजपूत यांना एकरकमी सानुग्रह मदत म्हणून प्रत्येकी 21 लाख रुपये द्यावे, अशी मागणी डॉ.नी.तू.पाटील, उत्तर भारतीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमाशंकर दुबे, शहराध्यक्ष परीक्षित बर्हाटे, साई निर्मल फाउंडेशनचे शिशिर जावळे, संदीप सुरवाडे यांनी विविध मागण्यांचा समावेश असलेले निवेदन दिले.

