भुसावळकरांना दिलासा : करवाढ नसलेला 24.35 लाख शिलकीचा अर्थसंकल्प सादर


अनाठायी खर्चाला कात्री : कोरोना उपाययोजनांसाठी उद्याने निर्मिती व दुरुस्तीसह आरोग्यावर भरीव तरतूद

भुसावळ : नाशिक विभागात एकमेव ‘अ’ वर्ग पालिका असलेल्या भुसावळ नगरपालिकेने शुक्रवार, 26 रोजी सन 2021-2022 साठी 24.35 लाख शिलकीचे व 214.59 कोटींचे अर्थसंकल्प सादर केले व सत्ताधार्‍यांनी त्यास एकमुखाने मंजुरी दिली. अर्थसंकल्पात करात कुठलीही वाढ करण्यात न आल्याने भुसावळकरांना मोठा दिलासा मिळाला आहे शिवाय या अर्थसंकल्पात अनाठायी खर्चाला फाटा देण्यात आला असून आरोग्यासह रस्ते, उद्याने निर्मिती व दुरुस्ती तसेच कोरोना उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला आहे. शुक्रवारी पालिकेत लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्थसंकल्पासाठी ऑनलाईन सभा बोलावण्यात आली.

यांची सभेला उपस्थिती
या सभेसाठी विनोद चावरीया, लेखाधिकारी संजय बाणाईते, लेखापाल सुदर्शन शमनानी, सभा अधीक्षक, शेख परवेज अहमद, उपमुख्याधिकारी महेंद्र कातोरे, संगणक अभियंता अनिल गवारे, धीरज बाणाईते आदींची उपस्थिती होती.

करवाढ नसलेला पालिकेचा शिलकी अर्थसंकल्प
सन 2021-22 साठी पालिकेच्या शुक्रवारी झालेल्या विशेष ऑनलाईन सभेत 24.35 लाख शिलकीचे व 214.59 कोटी खर्चाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्यासाठी सुमारे दिड कोटींची तरतूद करण्यात आली आहे शिवाय विकासकामांना अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आले आहे. नवीन उद्याने निर्मिती व दुरुस्तीसाठी तसेच नवीन रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आली आहे तसेच फायर ऑडीट, फायर गाडी, नगरपालिका दवाखान्यात मानधन तत्वावर डॉक्टरांची नियुक्तीसाठीदेखील तरतूद करण्यात आली आहे.

नागरीकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प : नगराध्यक्ष
पालिकेच्या अर्थसंकल्पात कुठलीही करवाढ करण्यात आलेली नसून आगामी काळात शहरात विकासात्मक कामांसाठी भरीव तरतूद करण्यात आल्याने नागरीकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प ठरणार असल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !