भुसावळात रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई
भुसावळ : कोरोना काळात सर्व रेल्वे गाड्या आरक्षित धावत असल्या तरी काही प्रवाशांकडून विना तिकीट प्रवास केला जात असल्याने रेल्वे प्रशासनाने अशा प्रवाशांविरुद्ध धडक कारवाईला सुरूवात केली आहे. बुधवारी भुसावळ रेल्वे स्थानकावर राबवण्यात आलेल्या मोहिमेत 128 प्रवाशांकडून 74 हजार 960 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. 19 तिकीट तपासणी कर्मचारी व चार आर.पी.एफ कर्मचारी यांनी ही कारवाई केली.
कारवाईने उडाली खळबळ
भुसावळ मंडल वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार व मंडल वाणिज्य प्रबंधक श्री.बी.अरुण कुमार, सहाय्यक वाणिज्य प्रबंधक (टीजा), मंडल मुख्य तिकीट निरीक्षक आहुलवलिया आणि विशेष तिकीट तपासणी निरीक्षक वाय.डी.पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी भुसावळ रेल्वे स्थानकावर तिकीट तपासणी मोहिम राबवण्यात आली. या मोहिमध्ये बिना तिकीट प्रवास करणारे 128 केसेस मधून 74 हजार 960रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. दंड न भरणार्या पाच प्रवाशांविरुद्ध रेल्वे अॅक्ट 137 नुसार व रेल्वे अॅक्ट 138 नुसार दोन प्रवाशांवर कारवाई करण्यात आली.

