भुसावळात लसीकरण केंद्रात गोंधळ : चार तासात संपली लस
भुसावळ : कोरोना लसीकरणासाठी शहरातील सर्व केंद्रांवर शुक्रवारी रांगा लागल्या होत्या. पालिकेचे मुख्य रुग्णालय, महात्मा फुले आरोग्य केंद्र व वरणगाव रोडवरील शिव दत्त नगर आरोग्य केंद्रात नागरीकांनी गोंधळ घातल्याने काही काळ लसीकरण बंद पडले. दरम्यान, सर्व सहा केंद्रांवर 1200 डोस सकाळी 9 ते दुपारी 1 या अवघ्या चार तासात संपले. आरोग्य कर्मचार्यांनी वारंवार विनंती करुनही लोक रांगेत उभे राहत नव्हते. तरीही सकाळी 9नंतर अवघ्या चार तासात एक हजार 200 डोस संपले.
कक्षात शिरले नागरीक
शिवदत्त नगरातील केंद्रात गोंधळ घालून काही नागरीक थेट लसीकरण कक्षात शिरले. याबाबत सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर पाटील यांनी आमदार संजय सावकारे, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, मुकेश गुंजाळ, डॉ.नी.तू.पाटील यांना माहिती देवून पोलिसांना बोलवले. यानंतर लसीकरण पूर्ववत झाले. नागरिक व आरोग्य कर्मचार्यांच्या गोंधळात फिजिकल डिस्टन्सिंगचे मात्र बारा वाजले.


