भुसावळात दरोड्याच्या प्रयत्नातील तिघे जाळ्यात : दोघे पसार
भुसावळ : चाकू, कोयता, मिरची पूड घेवून दरोडा टाकण्याच्या बेतात असलेल्या तिघा आरोपींच्या बाजारपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या तर अंधाराचा फायदा घेत दोन संशयीत पसार झाले. रात्री 12.10 वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील वांजोळा फाट्याजवळ ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी जितेंद्र किसन गोडाले व नितीन जगदीश पथरोड (रा.वाल्मीक नगर, भुसावळ) या आरोपींना अटक करण्यात आली तर अन्य एक अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले तर गोपी धामणे व आकाश पारधे हे आरोपी पसार झाले. पाच आरोपींविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला तर अटकेतील दोघांना न्यायालयाने 7 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
राष्ट्रीय महामार्गावरील वांजोळा फाट्याजवळ काही संशयीत दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती पेलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून ही कारवाई केली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी पाचही संशयीतांवर झडप घातली. अचानक झालेल्या या प्रकाराने पाचही संशयीतांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी केलेल्या कारवाईत तीन जण पोलिसांच्या हाती लागले तर दोन जण अंधाराचा फायदा घेत पसार झाले. पोलिसांनी तिन्ही जणांना रात्रीच बाजारपेठ पोलिस ठाण्यात आणले. पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी तिन्ही जणांची चौकशी केली. याप्रकरणी प्रशांत सोनार या पोलिस कर्मचार्याने दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात दरोड्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हरीश भोये, योगेश महाजन पुढील तपास करीत आहे.



