सातपुडा कोविड सेंटरमध्ये लोकवर्गणीतून 50 बेडचे उद्घाटन
आमदार शिरीष चौधरी यांच्या निधीतून दोन मोठ्या ड्युरा सिलिंडरची उपलब्धता : रुग्णांची होणार सोय
फैजपूर : गेल्या एक महिन्यापासून सातपुडा कोविड सेंटरमध्ये 50 बेडची ऑक्सीजन प्रणाली यंत्रणा लोकवर्गणीतून उभारण्यात आली होती मात्र त्यासाठी लागणारा ऑक्सिजन उपलब्ध होत नव्हता व त्यामुळे ही यंत्रणा कार्यान्वित होत नव्हती अखेर ड्युरा सिलेंडर उपलब्ध झाल्याने न्हावी ग्रामीण रुग्णालय अंतर्गत येणार्या न्हावी रस्त्यावरील 50 बेडच्या सातपुडा कोविड सेंटरमधील ऑक्सिजन प्रणाली व ऑक्सिजन ड्युरा सिलेंडरचे नुकतेच सकाळी 11 वाजता महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, शास्त्री भक्ती किशोर दास व आमदार शिरीष चौधरी यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. दरम्यान, आमदार शिरीष चौधरी यांच्या निधीतून दोन मोठ्या ड्युरा ऑक्सीजन सिलेंडरची याठिकाणी उपलब्धता झाल्यावर या यंत्रणेचे लोकार्पण करण्यात आले. एका सिलेंडरमध्ये 20 लहान सिलेंडर एव्हढा ऑक्सिजन असणार आहे त्यामुळे परीसरातील रुग्णांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.
यांची होती उपस्थिती
उद्घाटनप्रसंगी मसाका चेअरमन शरद महाजन, प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार महेश पवार, पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी, नायब तहसीलदार आर.डी.पाटील, गटविकास अधिकारी निलेश पाटील, जिलहा परीषद सदस्य प्रभाकर सोनवणे, पंचायत समिती सदस्य शेखर पाटील, माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे, अनिरुद्ध सरोदे, मसाका संचालक नरेंद्र नारखेडे, कृउबा सभापती तुषार पाटील, नारायण चौधरी, कदीर खान, अनिल जंजाळे, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, सावदा येथील मुख्याधिकारी सौरभ जोशी, मंडक अधिकारी जे.डी बंगाळे, डॉ.बी.बी.बारेला, डॉ.अभिजीत सरोदे, डॉ.सौरभ तळेले, डॉ.प्रसाद पाटील व संजय राजपूत यांची उपस्थिती होती.

लवकरच लस उपलब्ध होणार : आमदार शिरीष चौधरी
फैजपूर शहर हे 40 ते 50 हजार वस्तीचे शहर आहे मात्र या ठिकाणी कोविड 19 लस उपलब्ध नसल्याने नागरीरकांना फैजपूर येथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या न्हावी ग्रामीण रुग्णालयात लस घेण्यासाठी जावे लागते. शहरात लस उपलब्ध व्हावी यासाठी आमदार शिरीष चौधरी यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी संपर्क साधून तत्काळ फैजपूर शहरात लस उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता नागरीकांना शहरात लस कधी उपलब्ध होणार याची वाट पहावी लागणार आहे.

