श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी आनंदा केशव पाटील
जळगाव जिल्हा सरचिटणीसपदी पंकज नामदेव चौधरी यांची वर्णी
भुसावळ (सोमवार, 24 ऑगस्ट 2026) : राजपूत समाजाच्या संघटन, सक्षमीकरण आणि समाजहिताच्या कार्यासाठी कार्यरत असलेल्या श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी भुसावळातील ज्येष्ठ समाजसेवक आनंदा केशव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
नियुक्तीपत्र प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंग पाटील व कार्यकारी अध्यक्ष दामोदर राजपूत यांच्याहस्ते त्यांना देण्यात आले तसेच भुसावळ येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले पंकज नामदेव चौधरी यांची जळगाव जिल्हा सरचिटणीस म्हणून जिल्हाध्यक्ष संदीप राणा, विठ्ठल मोरे यांच्याहस्ते नियुक्ती करण्यात आली.



ही नियुक्ती सनातन रत्न परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दनहरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने तसेच राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा डॉ.शीला भाभीसा सुखदेवसिंहजी गोगामेडी, राष्ट्रीय कार्यकारी उपाध्यक्ष तथा राष्ट्रीय संघटन महामंत्री योगेंद्रसिंहजी कट्यार, राष्ट्रीय उपाध्यक्ष अभयराजसिंहजी गोगामेडी, राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंदसिंहजी ठोके आणि महामंत्री सूरजसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंग पाटील यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या.
भुसावळातील ज्येष्ठ समाजसेवक आनंदा केशव पाटील यांनी केलेल्या समाजकार्याची दखल करणी सेनेने घेतली आहे. प्रदेश सचिव या पदावर नियुक्ती देण्यात आली. पंकज नामदेव चौधरी यांच्या सामाजिक आणि संघटनात्मक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांच्यावर जळगाव जिल्हा सरचिटणीस या महत्त्वपूर्ण पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नियुक्तीनंतर मनोगत व्यक्त करताना आनंदा पाटील व पंकज चौधरी यांनी राजपूत समाजाचे संघटन अधिक बळकट करणे, समाजातील विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडणे आणि समाजहितासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करणे हेच आपले प्रमुख ध्येय राहील, असे सांगितले. प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंहजी पाटील कार्यकारी अध्यक्ष दामोदर राजपूत यांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी करणी सेनेचे सहप्रवक्ते राजेंद्रसिंह पाटील, प्रदेश सचिव आनंदा पाटील, जिल्हा अध्यक्ष संदीप सिंह राणा, महिला जिल्हाध्यक्ष सारिका पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष हरीश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दिवाणसिंह राजपूत, शहराध्यक्ष गोकुळ राजपूत,जिल्हा उपाध्यक्ष मीना राजपूत, जिल्हा सचिव कविता राजपूत, महिला तालुकाध्यक्ष जयश्री राजपूत, शहराध्यक्ष प्रतीक्षा पाटील, विनोद पवार (छत्रपती संभाजीनगर), मोहनसिंग पवार पाटील (चाळीसगाव), लता पाटील यांच्यासह अनेक पदाधिकार्यांनी शुभेच्छा देत संघटना अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

