जळगाव-ममुराबाद रस्त्यावर भरधाव ट्रकच्या धडकेत दहा वर्षीय बालक ठार : संतप्त जमावाने ट्रक पेटवला


शेख काबीज
जळगाव (सोमवार, 24 ऑगस्ट 2026) : जळगाव शहरातील ममुराबाद रस्त्यावर प्रजापती नगराजवळ सोमवारी कावड यात्रेदरम्यान भीषण अपघाताची घटना घडली. देवीच्या मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडणार्‍या प्रबल राजू गवळी (10, गवळीवाडी, शनीपेठ, जळगाव) या बालकाला पाठीमागून ट्रकने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले व जमावाने ट्रक पेटवून दिला.

नागरिक संतप्त : वाहतूक ठप्प
अपघाताची माहिती परिसरात पसरताच मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले. चिमुकल्याच्या मृत्यूमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला. संतप्त जमावाने अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रकला आग लावली. ट्रक पेटल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. पेटलेला ट्रक विझविण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न करण्यात आले मात्र संतप्त जमावाकडून ट्रकची आग विझविण्यास विरोध करण्यात आल्याने परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली.




जमावाने ट्रक चालकाला चोपले
संतप्त जमावाने अपघातास कारणीभूत ट्रक चालक उबेद खान इकबाल खान पठाण (चोपडा) यास जबर चोपून काढले तसेच ट्रक चालकाला तत्काळ घटनास्थळी आणून आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली. मृत बालकाचा मृतदेह रस्त्यावर ठेवून जमावाकडून या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेण्यात आली. भूपेंद्र नटवरलाल गुजराथी यांच्या मालकिचा ट्रक (एम.एच.20 ई.जी.3593) असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त
घटनेनंतर ममुराबाद रस्त्यावर काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. संतप्त नागरिकांची समजूत काढत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत.

कावड यात्रेदरम्यान भाविकांची मोठी गर्दी असताना भरधाव वाहनामुळे हा अपघात झाल्याने सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. अपघाताचे नेमके कारण, ट्रकचा वेग आणि चालकाची स्थिती याबाबत पोलीस तपासानंतर अधिकृत माहिती स्पष्ट होणार आहे. मृत बालकाचा मृत सिव्हीलमध्ये हलवण्यात आला असून चालकालाही उपचारार्थ तेथे हलवण्यात आले आहे. दरम्यान, वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर 26 रोजी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक एकत्रीतरित्या वाहतुकीची पाहणी करून उपाययोजना करणार आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !