महिला सक्षमीकरणाला ‘प्रेरणा’ची साथ; बचत गटांना 12 लाखांचे कर्ज
शिरपूर (सोमवार, 24 ऑगस्ट 2026) : महिला सक्षमीकरणासोबतच आर्थिक स्वावलंबन, आरोग्य, पोषण आणि शाश्वत उपजीविकेला चालना देण्याच्या उद्देशाने प्रेरणा लोकसंचालित साधन केंद्राची 17 वी वार्षिक सर्वसाधारण सभा अग्रेसन मंगल कार्यालयात उत्साहात पार पडली. यावेळी बचत गटातील महिलांना 12 लाख रुपयांचे बँक कर्ज वितरित करण्यात आले, तर परसबाग व किचन गार्डन उपक्रमासाठी भाजीपाला बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
सभेला नाशिक माविमचे विभागीय अधिकारी शैलेश पाटील, व्यवसाय विकास सल्लागार नवनीत नाईक, जिल्हा समन्वय अधिकारी वानखेडकर, सहनियंत्रण अधिकारी मिलिंद पाटील, आयसीडीएसच्या वैशाली निकम, आयसीआयसीआय बँकेचे संदीप बच्छाव, दिगंबर धोबी, एचडीएफसी बँकेचे तुषार लासुरकर, वन स्टॉप सखी सेंटरच्या गायत्री भामरे व भावना पाटील, सप्तशृंगी बहुउद्देशीय संस्थेचे विशाल शिरसाठ, दिशा सीएमआरसीच्या व्यवस्थापक ललिता माळी, कल्पतरू सीएमआरसीचे व्यवस्थापक भूषण ब्राह्मणे, प्रेरणा सीएमआरसीच्या अध्यक्ष रंजना शिरसाट, सचिव मालती सूर्यवंशी, उपाध्यक्ष बेबी वाघ यांच्यासह कार्यकारिणी सदस्य, सीआरपी, बँक सखी, सहयोगिनी व बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. सीएमआरसीची प्रस्तावना वानखेडकर यांनी तर व्यवस्थापक नीता बाविस्कर यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. शैलेश पाटील व नवनीत नाईक यांनी महिलांना सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि बचत गटांच्या माध्यमातून उपलब्ध होणार्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. वैशाली निकम यांनी महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.
महिला बचत गटांच्या उपक्रमांना सहकार्य करणार्या ‘माविम मित्र मंडळा’तील पुरुषांचा स्मृतीचिन्ह, टी-शर्ट, टोपी व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. उत्कृष्ट कर्जपरतफेड करणार्या बचत गटांसह उत्कृष्ट कार्य करणार्या सीआरपी व बँक सखींचाही प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
घराच्या परिसरातील उपलब्ध जागेचा उपयोग करून पौष्टिक भाजीपाला उत्पादन करण्यास महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी परसबाग व किचन गार्डन उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातून कुटुंबाच्या आहारात ताज्या व पौष्टिक भाजीपाल्याचा समावेश होण्याबरोबरच महिलांना घरगुती पातळीवर उत्पादनाची संधी मिळणार आहे. यावेळी बचत गटातील महिलांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
दरम्यान, सद्गुरू कृपा पिळोदा, अमर प्रेम शिरपूर व ऋषिकेश शिरपूर या बचत गटांना कर्जाचे धनादेश देण्यात आले. महिलांच्या आरोग्य, पोषण आणि शाश्वत उपजीविकेच्या दृष्टीने केंद्राच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
वन स्टॉप सखी सेंटरच्या अॅड.गायत्री भामरे यांनी महिलांचे कायदे व संरक्षण याबाबत मार्गदर्शन केले तसेच बालविवाहाच्या गंभीर परिणामांबाबत जनजागृती करून उपस्थितांकडून बालविवाह प्रतिबंधाची शपथ घेण्यात आली. बालविवाहामुळे मुलींच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणार्या परिणामांची माहिती देण्यात आली.
सूत्रसंचालन भूषण ब्राह्मणे यांनी केले. यशस्वीतेसाठी सीएमआरसी व्यवस्थापक नीता बाविस्कर, लेखापाल प्रशांत बारी, गायत्री पाटील, शिल्पा चव्हाण, कविता माळी, रविता पावरा, कल्पना माळी, बँक सखी ज्योती पाटील व अनिता पाटील यांनी परिश्रम घेतले.

