भुसावळात ‘जीवनवाहिनी’चे चाक तोट्यातच


कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवरील लॉकडाऊनचा फटका : अवघे 25 हजार उत्पन्न

भुसावळ : ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली लालपरी प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी आगारातच थांबून आहे. वर्ष झाले तरी कोरोनाचा घट्ट विळखा सुटायला तयार नाही त्यामुळे जीवाच्या धोक्याने प्रवासीही घराबाहेर पडेनासे झाल्याने नाईलाजाने प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी सुमारे शंभरावरील फेर्‍या आता अवघ्या दिवसाला 24 ते 25 होत आहेत त्यामुळे पूर्वी येणारे अडीच लाखांचे उत्पन्न आता अवघ्या 20 ते 25 हजारात येत आहे. फेर्‍यांच्या तुलनेत इंधनाचा खर्चही निघेनासा झाल्याने एस.टी.चे चाक आणखीन तोट्यात जात असल्याची शोकांतिका आहे.

दिवसभरात होतात केवळ आठ ते दहा फेर्‍या
भुसावळ आगारात सद्यस्थितीत 44 बसेस आहेत. कोरोना पूर्वीच्या काळात साधारण 100 ते 120 फेर्‍या ग्रामीण, लांब व मध्यम पल्ल्याच्या व्हायच्या तसेच बसेस प्रति दिवस एक हजार 800 किलोमीटर अंतर कापून दिवसाला अडीच ते तीन लाख रुपये उत्पन्न आणायच्या आता मात्र प्रवाशांनी पाठ फिरवल्याने 25 ते 30 हजार रुपये उत्पन्न प्रती दिवस येत असून 8 ते 10 फेर्‍या होत आहेत. ग्रामीण भागातील प्रवासी येत नसल्याने ग्रामीणच्या फेर्‍या बंद आहेत तर वर्दळीच्या जळगाव, रावेर, मुक्ताईनगर, यावल गावासाठी फेर्‍या सुरू आहेत. 200 चालक व वाहकांपैकी 20 ते 25 कर्तव्य बजावत आहेत.



प्रतिकुल परीस्थितीत काम
अवैध प्रवासी वाहतूक सेवेकडे दुर्लक्ष करून शासनाने दिलेल्या आदेशांचे पालन करून एस.टी.कर्मचार्‍यांनी कोरोना काळातदेखील सेवा बजावली आहे. भुसावळ आगारातील बरेचचे कर्मचारी व बसेस मुंबई येथे सेवा देण्यासाठी पाठवण्यात आल्या आहेत. प्रतिकुल परीस्थितीत एस.टी.कर्मचारी काम करीत आहेत, असे आगारप्रमुख पी.बी.चौधरी म्हणाले.

सुरक्षेच्या दृष्टीने सुविधा पुरवण्यात
जे कर्मचारी कोरोनाने बाधीत आहेत अशा कर्मचार्‍यांना विशेष रजा शासनाने मंजूर करावी तसेच आदेश एस.टी.महामंडळाला देण्यात यावेत. कोरोना काळात ड्युटी कर्मचार्‍यांना सॅनिटायझर, हॅण्ड ग्लोज व सुरक्षेच्या दृष्टीने सुविधा पुरवण्यात याव्यात व कोरोना काळातील पगार रोखण्यात येवू नये, असे भुसावळ आगार कामगार संघटना प्रसिद्धी सचिव धर्मराज देवकर म्हणाले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !