भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत दोघे युवक ठार
सावदा : भरधाव ट्रॅक्टरने धडक दिल्याने दोघा युवकांचा मृत्यू झाला.गौरखेडा-कुंभारखेडा फाटा रस्त्यावर रविवार. 9 मे रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. धडक इतकी जोरदार होती दुचाकीस्वाराचा हात या अपघातात कापला गेला. याबाबत सावदा पोलिस स्टेशनला ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघा युवकांचा मृत्यू
कुंभारखेडा फाट्यावरून राजू रमजान तडवी हे लोहारा गावाकडे दुचाकीनेजात असताना गौरखेडा येथील युनूस समशेर तडवी याने लिप्ट मागितल्याने दोन्ही जण दुचाकीने जात असताना समोरून सुसाट वेगाने येणार्या ट्रक्टरने जोरदार धडक दिल्याने दोघे दुचाकीस्वार फेकले गेले. तडवी यांच्या मालकिच्या दुचाकीचा पूर्णपणे चुराडा झाला तर लोहारा येथील राजू तडवी यांचा एक हात शरीरापासून वेगळा होवून 8 ते 10 फूट अंतरावर फेकला गेला तर दुचाकीमागे बसलेल्या गौरखेडा येथील युनूस समशेर तडवी (34) यांना उपचारार्थ हलवताना त्यांचीही प्राणज्योत मालवली. अपघातानंतर गौरखेडा व लोहारा गावावर शोककळा पसरली. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक विजय प्रेम सिंग राठोड (रा.लोहारा, ता.रावेर) यांनी स्वतः पोलीस स्टेशनला येऊन अपघाताची माहिती दिली. ट्रॅक्टर चालकास अटक करण्यात आली. अपघातग्रस्त ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतले. मयत दोघे तरुण घरातील कमावते सदस्य असल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले आहे. सावदा पोलिस स्टेशनला मुशीर रमजान तडवी (रा.लोहारा, ता.रावेर) यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. मयत राजू रमजान तडवी (49) यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परीवार आहे तर मयत युनुस समशेर तडवी (34) हे गौरखेडा येथील माजी सरपंच समशेर तडवी यांचे मोठे सुपुत्र होत. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, बहिण, आई-वडील असा परिवार आहे. तपास सावदा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डीडी इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, पोलिस कॉन्स्टेबल युसूफ तडवी, मेहरबान तडवी व सहकारी करीत आहे.



