भुसावळात भरधाव इनोव्हाची धडक : रेल्वे कर्मचारी ठार
नशिराबादजवळील टिघरे शिवारात अपघात : अपघातानंतर कारचालक पसार : अपघातग्रस्त वाहने पोलिसांनी केली जप्त
भुसावळ : भरधाव इनोव्हाने दिलेल्या धडकेत रेल्वेतील कर्मचार्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना टिघरे शिवारातील माऊली पेट्रोल पंपासमोर गुरुवारी सकाळी घडली. या अपघातात रेल्वेतील कर्मचारी रामा भादू शिरोळे (57, रा. अष्टविनायक कॉलनी, भुसावळ) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर इनोव्हा चालक पसार झाला. अपघातानंतर अष्टविनायक कॉलनीत शोककळा पसरली.
डोक्याला मार लागल्याने जागीच मृत्यू
रेल्वेतील कर्मचारी रामा शिरोळे हे ज्युपीटर गाडी (एम.एच.19 सी.एम.793) ने जळगाव खुर्द येथे त्यांच्या मूळगावी जात असतसाना भुसावळकडून जळगावकडे जाणारी इनोव्हा (एम.एच.19 बी.यु.8988) ने धडक दिली.साकेगावजवळील पूल ओलांडून वळण घेऊन पुढे गेल्यावर हा अपघात झाला तर शिरोळे हे दुभाजकावर आदळल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक गणेश चौधरी, हवालदार प्रवीण ढाके यांच्यासह अन्य सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्ञानेश्वर रामा शिरोळे यांनी दिलेल्या माहितीवरून नशिराबाद पोलिस ठाण्यात इनोव्हा चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. मृत रामा शिरोळे याचा मृतदेह हा भुसावळ येथे आणून ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.



