भुसावळात उद्यापासून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी
मुख्य भाजी बाजार करणार बंद : 5 जागी भरणार बाजार : 11 नंतर सुरू असलेली दुकाने होणार सील
भुसावळ : शासनाकडून वारंवार सूचना देऊन सुध्दा नागरीक घराच्या बाहेर पडत असल्याने आणि गुपचूप सुरू असलेली दुकाने लक्षात घेता, सोमवारपासून शहरात लॉकडाऊनची अंमलबजावणी अत्यंत कडक होणार आहे. 11 वाजेनंतर दुकाने सुरू दिसल्यास त्या दुकानांना लॉकडाऊनच्या काळापर्यत सील केले जाणार आहे तर मुख्य भाजी बाजार बंद करून शहरात अन्य पाच ठीकाणी भाजी बाजार भरविला जाणार आहे. 11 वाजेनंतर शहरात रीकाम्या फिरणार्यांच्या मोटर सायकली ही 31 मे पर्यत जमा केल्या जाणार असल्याची माहिती प्रांताधिकारी रामसिंग सूलाणे यांनी दिली.
जळगावातील बैठकीनंतर निर्णय
कोरोना रूग्ण संख्येत घट होण्यासाठी मुख्यमंत्री यांनी शुक्रवारी राज्यातील जिल्हाधिकार्यांची बैठक घेऊन प्रत्येक जिल्हानिहाय आढावा घेतला. याच पार्श्वभुमीवर शनिवारी जिल्हाधिकारी डॉ.राऊत व जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी ऑनलाईन अधिकार्यांची बैठक घेतली होती. या बैठकीनंतर प्रांताधिकारी सूलाणे यांनी सांगितले की, शहरात दिवसेंदिवस वावरणार्यांची संख्या वाढत आहे तसेच काही दुकानदार हे 11 वाजेनंतरही त्यांची दुकाने अर्धवट शटर ठेऊन उघडी ठेवतात, यामुळे नागरीक घराच्या बाहेर पडत असतात. शहरातील विविध रस्त्यांवर सुध्दा फळ, भाजीपाल्यासह अन्य विक्रेते 11 वाजेनंतरही थांबत असतात, हा सर्व प्रकार थांबविण्याच्या सक्त सूचना जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी दिल्या आहे. यामुळे या आदेशांचे सक्त पालन केले जाणार आहे.

अत्यावश्यक सेवेसाठी रीक्षा राहणार सुरू
अत्यावश्यक सेवेसाठी रीक्षा सुरू राहणार असल्या तरी त्या रीक्षांना आत प्लॅस्टीकचा पडदा टाकावा लागणार आहे. पोलिस रीक्षा थांबवून रीक्षांची तपासणी करणार आहे, जर पडदा नसला तर रीक्षा चालकांवर कारवाई होणार आहे. रीक्षा चालकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. शहरातील गर्दीची ठीकाणी रविवारी पालिकेच्या माध्यमातून नोंद केली जाणार आहे, गर्दीची ठीकाणावरील गर्दी कमी करण्यासाठी नियोजन केले जाणार आहे.
यांची बैठकीला उपस्थिती
प्रांतांधिकारी कार्यालयात ऑनलाईन बैठकीला तहसीदार दीपक धिवरे, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, गटविकास अधिकारी विलास भाटकर, पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, निरीक्षक दिलीप भागवत, तालुका वैद्यकीय अधिकारी संगीता दवंगे, डॉ.किर्ती फलटणकर आदी उपस्थित होत्या.
येथे भरणार बाजार
शहरातील मुख्य बाजार सोमवारपासून बंद केला जाणार आहे. त्या ऐवजी शहरातील विविध भागात नव्याने भाजी बाजार भरविले जाणार आहे. सकाळी 7 ते 11 या वेळातच भाजी बाजार भरणार आहे. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, भुसावळ हायस्कूल जवळ, टिव्ही टॉवर मैदान, विकास कॉलनी, रजा टॉवर खडकारोडवरील पालिकेची शाळा नंबर 32 या पाच ठीकाणी बाजार भरविला जाणार आहे. येथेच भाजीपाला मिळेल. रस्त्यावर 11 वाजेनंतर जर कोणी भाजीपाला विक्री करण्यास बसले तर त्यांचा भाजी पाला पालिकेतर्फे जप्त केला जाणार आहे.
11 वाजेनंतर दुकान सुरू दिसल्यास सील ठोकणार
प्रशासनाने सकाळी 7 ते 11 या वेळातच दुकान सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहे. मात्र काही दुकानदार हे गुपचूपरीत्या अर्धे शटर उघडे ठेवतात, अश्या दुकानदारांना आता दंड होणार नाही, अश्या दुकानांना 31 मे पर्यत सील केले जाणार आहे. त्यासाठी पालिकेची पथके अॅक्टीव केली जाणार आहे.
रीकाम्या फिरणार्याची वाहने होणार जमा
हॉस्पीटल व मेडीकल वगळता जर कोणी सकाळी 11 वाजेनंतर रस्त्यावर फिरतांना दिसला तर अश्यांची बाईक अथवा अन्य वाहने ही पोलिस लॉकडाऊनच्या काळापर्यत जमा करून घेणार आहे. 1 जूननंतरच त्यांची वाहने त्यांना कोर्टाच्या सूचनेनंतर परत मिळतील, असे प्रांताधिकारी सूलाणे यांनी सांगितले.
कोरोना हॉस्पीटलमध्ये जाणार्यांची होणार टेस्ट
शहरातील ज्याही कोरोना हॉस्पीटलमध्ये रूग्ण असून त्यांना भेटण्यासाठी जाणार्या त्यांच्या नातेवाईकांची सुध्दा आता कोरोना चाचणी केली जाणार आहे. अत्यावश्यक असेल तरच कोरोना हॉस्पीटलमध्ये नातेवाईकांना जाऊ दिले जाणार आहे, अन्यथा त्यांनाही हॉस्पीटलला जाण्यास मज्जाव केला जाणार आहे.
जामनेर रोड बॅरेकेटने बंद करणार
शहरातील जामनेर रोडवर विविध ठिकाणी बॅरेकेट लावून हा मार्ग बंद केला जाणा आहे. मोटर सायकल अथवा चारचाकीने जाणार्यांना येथे थांबविले जाणार आहे. हॉस्पीटलशिवाय वेगळे कारण असल्यास त्यांची वाहने ताब्यात घेतली जाणार आहे. कलम 144 ची सक्त अंमलबजाणी केली जाणार आहे. असे प्रांत सुलाणे यांनी सांगितले.

