वरणगाव नगरपरिषदेचा पाणीटंचाईवर यशस्वी उपाय : तापी नदीत अत्याधुनिक पाणबुडी पंप कार्यान्वित


वरणगाव (22 जून 2026) : हातनूर धरणातून पाण्याचे आवर्तन न सुटल्याने वरणगाव शहरात संभाव्य पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होत असताना, वरणगाव नगरपरिषदेने तातडीने उपाययोजना करत तापी नदीपात्रात अत्याधुनिक पाणबुडी पंप कार्यान्वित केला आहे. या उपक्रमामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यात मोठी वाढ होणार असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

नगराध्यक्षांनी केली पाहणी
लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी स्वतः तापी नदीपात्रात उतरून कामाची पाहणी केली तसेच पंप बसविण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेतला. नगरपरिषदेने नव्याने उच्च क्षमतेचा पाणबुडी पंप खरेदी करून तो नदीपात्रात बसविण्याचा निर्णय घेतला होता.

यांची होती उपस्थिती
सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेल्या या कामासाठी नगरसेवक नाना चौधरी, अभियंता ज्ञानेश्वर पवार, जनसेवक शामराव धनगर, मिलिंद भैसे, फझल शेख, बळीराम सोनवणे, शंकर पवार, अजमलभाई, निलेश झांबरे, मुख्तार खान, शंकर जावळे, मयूर भगाळे, योगेश धनगर तसेच पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी वासूभाई यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले. अखेर सायंकाळी चार वाजता पंप यशस्वीरित्या सुरू करण्यात आला.

यापूर्वी नदीपात्रात 15 एचपी क्षमतेचे दोन पंप कार्यरत होते. या दोन्ही पंपांचा एकत्रित पाणीउपसा सुमारे दीड लाख लिटर प्रतितास होता. नव्याने बसविण्यात आलेल्या पंपाची क्षमता अधिक असून त्याचा डिस्चार्ज सुमारे दोन लाख लिटर प्रतितास आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यात लक्षणीय वाढ होणार असून भविष्यात आवर्तन उशिरा सुटले तरी पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात टाळता येणार आहे.
यावेळी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, नगरपरिषदेने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. मात्र नागरिकांनीही पाण्याची नासाडी टाळून काटकसरीने वापर करावा.

पाणी ही सामूहिक संपत्ती असून तिचे जतन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. नगरपरिषदेच्या या तत्पर आणि नियोजनबद्ध उपक्रमामुळे वरणगावकरांना मोठा दिलासा मिळाला असून शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला बळकटी मिळाली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !