जळगाव जिल्हा पोलीस दलाची मोहिम : हॉटेल्ससह ढाब्यांवर दारू विक्री करणार्यांवर कारवाई तर हॉटेल्ससह लॉजचीही कसून तपासणी
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, टवाळखोर आणि नियमभंग करणार्यांवर पोलिसांचा धडक कारवाईचा बडगा : शाळा-महाविद्यालय परिसर, हॉटेल्स, कॅफे, ओयो हॉटेल्स आणि महामार्गावरील धाब्यांची होणार तपासणी
District Police Drive: Action against those selling alcohol at hotels and *dhabas*; thorough inspections of hotels and lodges. जळगाव (22 जून 2026) : जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच युवकांमध्ये वाढत असलेल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सोमवार, 22 रोजी सायंकाळपासून जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत विविध सार्वजनिक ठिकाणे, शाळा-महाविद्यालय परिसर, हॉटेल्स, कॅफे आणि महामार्गावरील धाब्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
उघड्यावर दारू पिणारे रडारवर : हॉटेल्ससह ढाब्यांवरही कारवाई
पोलिसांकडून वाइन शॉपसमोर, मोकळ्या मैदानांमध्ये, खाद्यपदार्थांच्या गाड्यांजवळ तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी बसून मद्यपान करणार्या व्यक्तींवर कारवाई केली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून शांतता भंग करणार्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे तसेच महामार्गावरील हॉटेल्स, ढाब्यासह तसेच अंडा-भूर्जीच्या टपर्यांवर अवैधरित्या विक्री होणार्या मद्यावरही आळा घालण्यात येणार आहे.

याशिवाय शाळा, महाविद्यालये आणि खासगी क्लासेसच्या परिसरात सायंकाळच्या वेळी वेगाने वाहने चालविणारे, विद्यार्थ्यांची छेड काढणारे तसेच टवाळखोरी करणार्यांवर विशेष नजर ठेवली जाणार आहे. बुलेटसह इतर दुचाकींवर नियमबाह्य सायलेंसर बसवून मोठ्या आवाजात वाहन चालविणार्यांवरही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. महामार्गालगत असलेल्या परवानाविरहित हॉटेल्स व धाब्यांमध्ये मद्यपान करणार्या व्यक्तींची तपासणी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल. तसेच अशा ठिकाणांच्या वैध परवान्यांचीही पडताळणी केली जाणार आहे.
लॉज तसेच गेस्टहाऊसची तपासणी
अल्पवयीन मुला-मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने ओयो हॉटेल्स व तत्सम निवासस्थाने तपासण्यात येणार असून, संशयास्पद हालचाली आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. कॅफे आणि अन्य गर्दीच्या ठिकाणांचीही तपासणी केली जाणार आहे. शाळा व महाविद्यालयांच्या 100 मीटर परिसरातील पानटपर्या आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणार्या आस्थापनांवर कोटपा कायद्याअंतर्गत विशेष मोहीम राबवून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
पोलिस प्रशासनाने नागरिकांना कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले असून, संशयास्पद प्रकार अथवा गैरप्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही मोहीम आगामी काळात अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली.

