ठाकरेंच्या सेनेला धक्का : सहा खासदार शिंदेसेनेत ; एकनाथ शिंदे म्हणाले ; विचारधारा सोडणार्यांना महाराष्ट्राने नाकारले
Blow to Thackeray’s Sena: Six MPs join Shinde’s faction; Eknath Shinde says Maharashtra has rejected those who abandoned the ideology. मुंबई (22 जून 2026) : काही लोकांनी विचारधारा सोडल्यामुळे या महाराष्ट्राने त्यांना नाकारले असल्याची टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत शिंदे सेनेत दाखल झालेल्या सहा खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिल्यानंतर या खासदारांनी आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते.
पत्रकार परिषदेत मांडली भूमिका
मागील दोन-तीन दिवसांपासून सर्वांपासून नॉटरिचेबल असलेले हे खासदार सोमवारी दुपारी बंदोबस्तात मुंबईत दाखल झाले होते. त्यानंतर वाय.बी. चव्हाण सेंटर येथे सर्व सहा बंडखोर खासदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका मांडली.

काय म्हणाले एकनाथ शिंदे ?
एकनाथ शिंदे तुमच्यासोबत कार्यकर्ता म्हणूनच वागेल, तुमच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांचा मान-सन्मान राखला जाईल. आपण आता एका परिवारात आलेलो आहोत आणि या पुढच्या काळात जे काही विकासासाठी आवश्यक आहे. ते देण्यासाठी हे डबल इंजिनचे सरकार आहे. आपली कामे होतील आणि अडचणी सुटतील. आपल्या विश्वासाला कदापिही तडा मी जाऊ देणार नाही, असा विश्वास शिंदे यांनी यावेळी सहा खासदारांना दिला.
आमचा अजेंडा विकासाच
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, आपला अजेंडा विकास आहे. दिलेला शब्द पाळणारी ही शिवसेना असून त्यामुळे हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे येण्याचा ओघ सुरू आहे. जे खासदार आपल्यासोबत आले आहेत, ते मोठ्या संख्येने निवडून आले आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या मतदारसंघातील जनतादेखील आपल्यासोबत जोडली जाणार आहे. त्यांचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्याचे काम शिवसेना करेल, हा एकनाथ शिंदे यांचा शब्द आहे.
तेव्हा आम्ही उठाव केला : एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे म्हणाले, ओमराजे निंबाळकर यांच्या पाठीशी एकनाथ शिंदे खंबीरपणे उभे आहेत. काही लोक म्हणतात, आम्ही शिवसेना वाढवायला आलो आहोत. पण आम्ही कोणाच्या आडवे जात नाही, कोणी आडवे येऊ नये. आले अंगावर तर घेतले शिंगावर. तेव्हा देखील आम्ही एक विचारधारेसाठी, बाळासाहेबांची विचारधारा सोडून दूसरा विचार जेव्हा आला तेव्हा आम्ही उठाव केला. जो निर्णय तेव्हा घेतला तो सर्वसामान्य जनतेने स्वीकारला. लोकांमध्ये आम्ही गेलो आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेने आम्हाला स्वीकारले आणि त्याचे जे 40 आमदार होते, तेव्हा ते म्हणाले होते एकही निवडून येणार नाही. मी तेव्हा म्हणालो होतो 40 आमदार होते 60 आमदार निवडून आणले.

