रामगड येथे विवाहितेचा विहिरीत बुडाल्याने मृत्यू
मुक्ताईनगर : तालुक्यातील रामगड येथील 24 वर्षीय महिलेचा विहिरीत बुडून मयत झाल्याची घटना 15 रोजी सकाळी 8 वाजेच्या दरम्यान उघडकीस आली.
याबाबत मुक्ताईनगर तालुक्यातील राम गड येथील गुलाब गुमान भिलाले (65) यांनी मुक्ताईनगर पोलिसात दिलेल्या खबरीत म्हटले आहे की , 14 रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांची विवाहित मुलगी सीता सुमेरसिंग भिलाले (24, रामगड, तालुका मुक्ताईनगर) ही शौचास जाते, असे सांगून घरातून निघून गेली परंतु ती रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही. परंतु दुसऱ्या दिवशी 15 रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील करकी येथील विनोद दत्तू पाटील यांच्या शेतातील विहिरीत तिचा मृतदेह आढळला. मुलीच्या वडिलांच्या खबरी वरून पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिस उपविभागीय अधिकारी विवेक लावंड यांच्यासह पोलिस निरीक्षक रामकृष्ण पवार यांनीही भेट दिली. तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण पवार करीत आहेत.




