वीज ग्राहकांना दिलासा : हजारो रुपयांच्या वीज बिलात दुरुस्ती
शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
भुसावळ : कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना महावितरणने वाढीव वीज बिलांचा शॉक दिला होता. श्रीनगर,
खळवाडी, हुडको कॉलनी, भोई नगर, कांशीराम नगर विभागातील अनेक वीज ग्राहकांना मे महिन्यात वापर नसलेली अतिरिक्त देयके मिळाली. शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी याबाबत महावितरणच्या कार्यालयात यशस्वी पाठपुरावा केल्यानंतर एक हजार ते 17 हजार रुपयांपर्यंत वीज देयकात दुरुस्ती करून मिळाल्याने ग्राहकांना अडचणीच्या काळात मोठा दिलासा मिळाला आहे.
या ग्राहकांना मोठा दिलासा
धंनजय सोनवणे (चार 893 रुपये), काशिनाथ गुळवे (10 हजार 580), मधुसूदन ढाके (10 हजार 692), अशोक सोनवणे (9 हजार 49), ज्ञानदेव गुळवे (पाच हजार 739), राजेश पाटील (एक हजार 361) े, अरुण गोविंदा लोखंडे (17 हजार 311), निर्मला पाटील (एक हजार 275) रुपये, राधाबाई शंकर सोनवणे (12 हजार 13), चंद्रकांत पाटील (चार हजार 771), नलिणी अरुण तळेले (11 हजार 456) रुपयांची दुरुस्ती होऊन रक्कम देयकातून कमी करण्यात आली. तब्बल 12 ग्राहकांची एकूण एक लाखापर्यंतची रक्कम दुरुस्त झाल्याने ग्राहकांनी शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकार्यांचे आभार मानले आहेत.



अधिकार्यांना निलंबित करा
लॉकडाउनच्या काळात वीज ग्राहकांना भरमसाठ वीज बिले पाठवल्यानंतर राज्य सरकारसह ऊर्जा विभागाला तीव्र असंतोषाचा सामना करावा लागला होता परंतु तक्रार केल्यानंतर जिनस मीटर कंपनीने वेळीच अपडेट केले नाही आणि रीडींग एजन्सीने ग्राहकांना वेळेत देयक सादर केले नाही व रीडींगमध्येही वारंवार चुका केल्या हे आता सिद्ध झाले आहे. दोन्हीही एजन्सीवर कडक कारवाई न करणार्या प्रमुख अधिकार्यांच्या निलंबनाची मागणी ग्राहकांनी केली आहे.
कोर्टात जनहित याचिका दाखल करणार
महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. ग्राहक जे बिल असेल ते भरायला तयार आहे पण ते वीज बिल नेमकं आणि अचूक असावं, हीच ग्राहकांची अपेक्षा आहे. लॉकडाऊनमुळे हातात कमी पैसे असताना हजारोंच्या घरात अतिरिक्त रक्कमेची देयके एजन्सीच्या चुकीने ग्राहकांना दिले. वारंवार चुका करणार्या एजन्सीवर कारवाई न झाल्यास कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असे प्रा.धीरज पाटील यांनी कळविले आहे.

