ऐन परीक्षा काळात ‘बत्ती गुल’ : विद्यार्थी परीक्षेपासून वंचित
भुसावळ : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण तसेच विद्यापीठांच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाईन सुरू आहेत. असे असताना थोडासा पाऊस आलातरी वीज गुल होत असल्यारने विद्यार्थ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळा तोंडावर असतानाही वीज कंपनीकडून पावसाळापूर्व कामांना सुरूवात झाली नसल्याने या संदर्भात तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी भुसावळ शिवसेनेचे शहरप्रमुख बबलू बर्हाटे यांनी केली आहे.
खंडित विजेमुळे प्रचंड मनस्ताप
विद्यापीठांच्या ऑनलाईन परीक्षा असताना वीज गुल होत असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सोसावा लागत आहे. भुसावळात एकाच पावसामुळे विजेचा लपंडाव सुरू झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला. पावसाळ्यापूर्वी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतर्फे धोकादायक असलेल्या झाडांच्या फांद्या छाटणे, वीज तारा ओढणे आदी कामेसुद्धा सुरू करण्यात आलेली नाहीत तर वीज गुल झाल्यानंतर विचारणा केली असता नेमकं उत्तर देणे अधिकार्यांना शक्य होत नाही. हेल्पलाईन कायम बंद किंवा व्यस्त असते. दोन दिवसात साधारण चार-सहा तास वीजपुरवठा बंद करण्यात आला. कोरोना परीस्थितीमुळे सर्वच परीक्षा ऑनलाईन असल्यामुळे सर्व परीक्षा घरून द्याव्या लागत आहेत. ऐन परीक्षेच्या वेळेसच महावितरण विभागाकडून वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांची पुरती दमछाक होत आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता वीज खंडित करण्यात येत असल्याने वेळेवर विद्यार्थ्यांची फजिती होत आहे. त्यातच अवकाळी पावसाने थैमान घातलेले आहे. पावसाचे वातावरण निर्माण झाल्यास हानी टाळण्याच्या दृष्टीने वीजपुरवठा बंद करण्यात येतो. वीज कंपनीने दीर्घकाळ वीजपुरवठा सुरळीत राहील, अशा प्रकारची कामे तत्काळ करावी, अशी मागणी भुसावळ शिवसेनेचे शहरप्रमुख बबलू बर्हाटे यांनी केली आहे. पदवी अभ्यासक्रमाची ऑनलाइन परीक्षा सुरू आहे. विजेच्या लपंडावाने परीक्षा देण्यात अनेक अडचणी येत आहेत. महावितरण विभागाने कोणत्या वेळेत वीजपुरवठा खंडित होणार आहे, याची पूर्वकल्पना दिल्यास गैरसोय दूर होणार आहे. वीज सेवा सुरळीत करण्यात यावी अन्यथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील व प्रमुख पदाधिकार्यांच्या उपस्थितीत आंदोलन केले जाईल, असा इशारा शहरप्रमुख बबलू बर्हाटे यांनी दिला आहे.



