रासायनिक खतांची दरवाढ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन : विवेक नरवाडे
भुसावळ : गत वर्ष भरापासून संपूर्ण देशात कोरोना या महामारीने लोकांचे जनजीवन विस्कळीत झालेले असतांना केंद्र सरकार मात्र दैनंदिन पेट्रोल, डिझेल, घरघुती गॅस या सारख्या अनेक जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ करतच आहे. त्यात कोरोना लॉकडाऊनमुळे शेतीमाल विक्री व्यवस्था कोलमडली असतांना आता पुन्हा नव्याने खत कंपन्यांनी शेतकर्याचे कंबरडे मोडणारी दरवाढ लागू केली आहे मात्र ही दरवाढ मागे न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाच्या वतीने विवेक नरवाडे यांनी दिला आहे. या संदर्भात कृषी दादा भुसे यांना ई मेलद्वारा निवेदन पाठवण्यात आले.
ही तर शेतकर्यांची घोर फसवणूक
खतांची दरवाढ होणार नसल्याचे रसायने व खत विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी जाहीर केले मात्र प्रत्यक्षात खतांच्या किंमतीत वाढ झाल्याने ही शेतकर्यांची एक प्रकारे घोर फसवणूक झाली आहे. केंद्र किंवा राज्य सरकार या मुद्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. खरीप हंगाम तोंडावर असतांना शेतकर्यांमध्ये खतांच्या दरांबाबत संभ्रम आहे. परीणामी शेतकरी खत घेण्यास तयार नाहीत. वास्तविक गेल्या दोन वर्षापासून शेतकर्यांना सलग नैसर्गिक आपत्तीस तोंड द्यावे लागत असून यामुळे उत्पादनास प्रचंड घट येऊन शेतकर्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. अगदी शेतकर्यांनी केलेल्या उत्पादनावरही देखील निघत नाही ही वस्तुस्थिती असतांना कंपन्यांनी खतांच्या किंमतीत भरघोस वाढ करून जगाचा पोशंदा असणार्या शेतकर्यांच्या तोंडाला पाणी पुसले आहे, असे विवेक नरवाडे यांनी म्हटले आहे. ज्या खत कंपन्यांनी रासायनिक खते व बी-बियाण्यांची दरवाढ केलेली आहे त्या कंपन्याना केलेली दरवाढ मागे घेण्यासाठी योग्य ते निर्देश द्यावेत अन्यथा काँग्रेस पक्ष शेतकर्यांसाठी रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा देखील नरवाडे यांनी दिला आहे.



