वरणगाव ग्रामीण रुग्णालयाला फिटल डॉपलर भेट


डॉ.पाटील दाम्पत्याचा पुढाकार : मदतीचे आवाहन

वरणगाव : वरणगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये दर गुरुवारी गरोदर मातांची तपासणी होते. त्यात प्रामुख्याने शरीरात वाढणार्‍या बाळाच्या हृदयाचे ठोक नियमित आहे की नाही? याबाबत विशेष लक्ष दिले जाते पण मागील तीन महिन्यांपासून फिटल डॉपलर मशीन बंद असल्याने तपासणी साध्या पद्धतीने होत आहे. ही बाब लक्षात आल्यावर वाढदिवसाचे औचित्य साधत ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठानच्या सचिव डॉ.रेणुका निलेश पाटील यांनी शनिवारी फिटल डॉपलर भेट दिले.

यांची होती उपस्थिती
या छोटेखानी उपक्रमात ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.नितु पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.सनी जैन, परीचारिका प्रीती आराक, शीतल बोद्दडे, प्रतिष्ठान सभासद कपिल राणे, दीपक फेगडे, राहुल कोचुरे आदी उपस्थित होते. डॉ.रेणुका निलेश पाटील म्हणाल्या की, ग्रामीण रुग्णालयात फिटल डॉपलरने बाळाचे ठोक्याचे आवाज आईला आणि डॉक्टरला ऐकता येतात.



सुव्यवस्था देण्याबाबत पुढाकार घ्यावा
ग्रामीण रुग्णालयात विविध प्रकारच्या समस्या असून त्यात मशिनरी आणि औषधे यांचा पण तुटवडा आहे. भुसावळ ग्रामीण रुग्णालयात ज्या प्रकारे लोकसहभागातून मदत कार्य सुरू झाले असून आता त्याठिकाणी मदत जनचळवळ झाली आहे, त्याचप्रमाणे वरणगाव आणि परीसरातील दानशूर नागरीकांनी पुढे येउन आपल्या ग्रामीण रुग्णांना चांगल्या सुव्यवस्था देण्याबाबत पुढाकार घ्यावा आणि या जनहितार्थ कार्यात आपला सहभाग वाढवावा, असे भावनिक आवाहन वासुदेव नेत्रालयाचे संचालक तथा उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक वैद्यकीय आघाडीचे डॉ.नितु पाटील यांनी केले आहे.

बाळाचे ठोके ऐकणे म्हणजे स्वर्गीय अनुभूती : डॉ.रेणुका पाटील
आपल्या उदरात वाढ होणाऱ्या बाळाच्या हृदयाचे लयबद्ध ठोके ऐकणे, हे कोणत्याही मातेसाठी स्वर्गीय आनंदाची अनुभूती देणारी बाब आहे. हा आनंद त्यांना मनसोक्त लुटता यावा तसेच डॉक्टरांना पण तपासणीमध्ये सुलभता यावी , म्ह्णून माझ्या वाढदिवसानिमित्त शनिवार, २३ मे रोजीचे औचित्य साधून फिटल डॉपलर मशीन भेट दिल्याचे वासुदेव नेत्रालयाच्या डॉ.रेणुका पाटील म्हणाल्या.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !