माणुसकी अद्यापही जिवंत : अनाथ वृद्धेवर केले अंत्यसंस्कार
वरणगावातील आरएसएस संघाच्या कार्यकर्त्यांनी निराधार महिलेवर केले अंत्यसंस्कार
भुसावळ : कोरोनाच्या कठीण काळात स्वकीयांच्या अंत्ययात्रेतही न जाण्याची अनेक उदाहरणे डोळ्यापुढे असताना वरणगावातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकार्यांनी मात्र निराधार (अनाथ) महिलेच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेत माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय झाला. विशेष म्हणजे महिलेच्या मृत्यूचे ठोस कारण नसल्याने कुणीही पुढे येत नसतानाही कार्यकर्ते मात्र डगमगले नाहीत.
‘जिथे कमी तिथे आम्ही’ उक्तीचा आला प्रत्यय
फुलगांव येथील चंद्रभागा सीताराम सुतार (65) या निराधार वृद्धेचा रविवारी मृत्यू झाला मात्र मृत्यूचे नेमके कारण कळू न शकल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी कुणीही पुढे यायला तयार नव्हते. याची माहिती वरणगाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाना कळताच त्यांनी तत्काळ धाव घेत निराधार महिलेच्या दोन नातेवाईकांना धीर देत अंत्यसंस्काराची सर्व प्रक्रिया पार पाडली. हितेश भंगाळे, गौरव श्रीखंडे, नथ्थु कोळी, भरत चंदने इत्यादी या स्वयंसेवकानी त्यासाठी पुढाकार घेतला.



