यावलमध्ये लहान मुलांच्या खेळण्यावरून तुंबळ हाणामारी : चौघे जखमी
यावल : शहरातील बाबुजीपूरा खाटीक वाडा भागात लहान बालकांच्या खेळण्यावरून झालेल्या वादात मंगळवारी तुंबळ हाणामारी होवून एका गटातील चौघे जखमी झाले. यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी यावल पोलिसात सात जणांविरूध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गंभीर जखमींवर गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. बाबुजीपुरा येथील खाटीक वाड्यातील रहिवासी सईदउल्ला खान जबीउल्ला खान यांच्या फिर्यादीनुसार रविवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास फयाजउल्ला खान ईब्राईम खान व रहिमउल्ला खान ईब्राईमखान यांना लहान मुलांचे खेळण्याचे कारणावरुन सलीम अजीज, तनवीर सलीम, तौकीर सलीम आदींनी शिवीगाळ करीत मारहाण केली. भांडण फिर्यादी यांनी सोडवले व या प्रकरणी रविवारी देखील पोलिसात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला होता. हे भांडण सोडवण्याच्या कारणावरून मंगळवारी फिर्यादीच्या घरासमोर येत रविवारी रात्री झालेले भांडण का सोडवले होते याचा राग मनात धरून तन्वीर अब्दुल सलीम, तौकीर अब्दुल सलीम, सलीम बाबा, अब्दुल अजीज, हमीद अब्दुल अजीज, सैजात अब्दुल हमीद व सोयब अख्तर या सात जणांनी तलवार, लोखंडी पाईप व लाठा-काठ्या घेवुन नयीमउल्ला खान जबीउल्लाखान (32), कलिम उल्लाखान जबीउल्लाखान (42), रईसउल्ला खान जबीउल्ला खान (34) व इब्राहिम खान मुस्तुफा खान यांना जबर मारहाण केली. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. डॉ.शुभम तिडके, अधिपरीचारीका नेपाली भोळे, सुमन राऊत, पिंटू बागुल, भूषण गाजरे यांनी प्रथमोपचार केले. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना गोदावरी हॉस्पिटलला हलवण्यात आले आहे. या प्रकरणी यावल पोलिसात दंगलीसह जीवे ठार मारण्याचा प्रयत्नांसह विविध कलमान्वये वरील सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.




